पेरण्या संकटात

By Admin | Published: July 10, 2017 04:37 AM2017-07-10T04:37:54+5:302017-07-10T04:37:54+5:30

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत.

In sow trouble | पेरण्या संकटात

पेरण्या संकटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत. मराठवाड्यात साधारण ४३ लाख हेक्टर खरीप पीक पेरणी क्षेत्र आहे. त्यातील सुमारे २५ टक्क्यांदरम्यान पेरणी झालेली आहे. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि.मी. इतकी असून आतापर्यंत १९० मि.मी.च्या आसपास म्हणजे केवळ २३ टक्के पाऊस झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला दमदार सुरुवात करून नंतर वरुणराजाने हात आखडता घेतला. मृगातही बऱ्यापैकी सरी कोसळल्याने फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात पिके बहरली. परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव,
कन्नड, सिल्लोड, पैठण तालुक्यात पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ टक्के पेरणी झाली;
मात्र पिके ऐन वाढीच्या काळात असतानाच १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.
हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकू लागली आहेत. शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी
देऊन पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.
लातूर जिल्ह्यात ८५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र असून, ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे़ त्यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ३ लाख हेक्टर पेरा आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी ७ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र खरीपयोग्य शेतजमीन आहे. जिल्ह्यातील ३० मंडळात अत्यल्प पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात पावसाचा तब्बल २० दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली आहे. आता पावसाअभावी वाढ खुंटली आहे. परभणी जिल्ह्यात ३ लाख ३०
हजार ६३७ हेक्टर (६३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ही सर्व पिके धोक्यात आहेत. हिंगोली जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत, मात्र
पाऊस नाही. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के खरीप पेरणी
पूर्ण झाली आहे. परंतु, २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले
आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
>२० हेक्टर क्षेत्रावर फिरविला रोटाव्हेटर
पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरविले. पाऊस नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सुनील कोळी, लोटन पाटील, तुषार पाटील, साहेबराव बडगुजर या शेतकऱ्यांनी सांगितले.
दुबार पेरणीनंतरही पाऊस न आल्याने आत्महत्या
जळगाव : दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याच्या भीतीने नितीन विठ्ठल काटे (३०, रा. सुनसगाव, ता. भुसावळ ) यांनी विषप्राशन करून रविवारी आत्महत्या केली.

Web Title: In sow trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.