राज्यात सरासरी ७०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:54 PM2020-07-05T17:54:03+5:302020-07-05T17:54:14+5:30
अमरावती विभागात सर्वाधिक ८६.८९ टक्के पेरणी झाली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : राज्यात यंदा मान्सून अपेक्षेच्या तुलनेत लवकर दाखल झाल्याने ५ जुलैपर्यंत आठही विभागात मिळून सरासरी ७०.७४ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. कृषी विभागाच्या ३ जुलै रोजीच्या अहवालानुसार राज्यात सर्वात कमी पेरणी ठाणे विभागात झाली आहे. या विभागात ५ जुलैपर्यंत १२.१५ टक्के पेरणी झाली आहे, तर अमरावती विभागात सर्वाधिक ८६.८९ टक्के पेरणी झाली आहे. त्याखालोखाल औरंगाबाद विभागात ८६.२२ आणि नाशिक विभागात ७७.०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ६५ हजार १५५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाच्या लागवडीचा समावेश आहे.
राज्यात ऊस पिकासह खरीप हंगामात सरासरी १ कोटी ५१ लाख ३३ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. गतवर्षी पावसाळ्याला विलंब झाला आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत राज्यात केवळ ७ लाख ३६ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र पाऊस वेळेवर आल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यामुळे राज्यातील आठही विभागात मिळून ५ जुलैपर्यंत १ कोटी ७ लाख ५ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. तथापि, कोकण विभागात अद्यापही पेरण्यांना वेग आलेला नाही. या विभागात केवळ १२.१५ टक्के पेरणी झाली आहे. त्याशिवाय नाशिक विभागात ७७.०९, पुणे विभागात ६३.२९, कोल्हापूर विभागात ५०.८०, औरंगाबाद विभागात ८६.२२, लातूर विभागात ६९.५९, अमरावती विभागात ८६.८९, तर नागपूर विभागात ५१.३७ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी उरकली आहे.