पेरणी धोक्यात
By Admin | Published: June 26, 2014 12:52 AM2014-06-26T00:52:33+5:302014-06-26T00:52:33+5:30
तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड
शेतकरी संकटात : दुबार पेरणीची शक्यता
हिंगणा : तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड असून आर्थिक नुकसानीच्या भीतीने बळीराजा हादरला आहे.
जून महिन्यातील १७, १८ व १९ तारखेला तालुक्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. कृषी विभागानुसार केवळ ३८.७ मिलि पावसाची नोंद झाली. हंगाम चुकू नये म्हणून कापूस उत्पादकांनी कपाशीच्या पेरणीची घाई केली. अशातच पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले बियाणे करपत आहेत.
तालुक्यात कपाशी लागवडीचे लक्षांक क्षेत्र १८ हजार हेक्टर आहे. सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रात धूळ पेरणी झाली असल्याची माहिती आहे. सोयाबीन पेरणीचे लक्षांक क्षेत्र ९५०० हेक्टरवर राहील, असा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यातच जवळपास चार हजार हेक्टरवरील सोयाबीनची धूळ पेरणी आटोपली. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस बरसला नाही तर बियाणे अन् शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चुराडा होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. आधीच कर्जबाजारी असलेला बळीराजा या नव्या संकटामुळे चिंताग्रस्त झाला आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी तुषार सिंचन सुरू करून पिकांना जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाशिवाय तरणोपाय नाही. तालुक्यातील भूजल पातळीत या महिन्यात लक्षणीय घट झाली आहे.
तालुक्यातील आमगाव-देवळी, मोहगाव, धानुली, कान्होलीबारा, गुमगाव, टाकळघाट, अडेगाव, कवडस या शिवारात धूळ पेरणी अधिक आहे. यास चुकीच्या हवामानाचा अंदाजही कारणीभूत असल्याचे जाणकारांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)