पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By admin | Published: July 10, 2017 01:48 AM2017-07-10T01:48:38+5:302017-07-10T01:48:38+5:30

पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

Sowing of rice in absence of rain | पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत. पूर्व भागातील पेरलेले बी उगवण्यासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७५०० हेक्टरवर भातची लागवड केली जाते. त्यासाठी ७०० हेक्टरवर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण भागात वळवाचे पाऊस झाल्यावरच धूळवाफेवर भाताचे बी पेरले जाते. मात्र, एप्रिल व मे महिन्यात वळवाचे एक दोन पाऊस पडले नाही, त्यामुळे भाताची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर जून महिन्यात १८ जूनला रिमझिम पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झालाच नाही. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना डोंगरातील झऱ्यांना पाणीच आले नाही. थाड्या फार प्रमाणात सुरूअसलेल्या पावसावर नीरादेवघर व भाटघर धरण भागातील शेतकऱ्यांनी भाताच्या लावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, मागील चार दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने खाचरातील पाणी कमी झाल्याने सुरू असलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा रखडल्या आहेत. पूर्व भागात पावसाअभावी उशिराने पेरलेले बी उगविण्यासाठी पावसाची गरज आहे.
वेल्हे : तालुक्याच्या पूर्व भागातील अतिपावसाच्या वेळवंडी नदीखोऱ्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून, सतत चालू असणारी संततधार थांबून पावसाने उघडझाप करत बरसण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे भातलागणीवर काहीसा परिणाम होत आहे. तर वेल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भातलागणी खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.पुणे जिल्ह्यातील ‘प्रतिमहाबळेश्वर’ अशी वेल्हे तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरी ३००० ते ४००० मि.मि. इतक्या विक्रमी पावसाची नोंद होत असल्याने हा परिसर अतिवृष्टी क्षेत्रामधे समाविष्ट होतो. जून ते सप्टेंबर दरम्यान अखंडित पाऊस चालू असतो. यात प्रामुख्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील १८ गावे मावळ भागातील वेळवंडी नदी खोरे, मढेघाट परिसर, मोसे खोरे, पानशेत धरण क्षेत्र या भागात विक्रमी सरासरी ३५०० मि.मि. पाऊस पडतो. वेळवंडी नदीतील सर्व पाणी वाहत जाऊन भाटघर धरणाला मिळते. या धरणातील एकूण पाण्यापैकी ६०% पाणी वेळवंडी नदीतून धरणाला मिळते. तर तालुक्याच्या पूर्व भागातील तोरणा-राजगड किल्ले परिसर, कानंदी नदी खोरे या भागात दरवर्षी सरासरी २५०० मि.मि. पावसाची नोंद होते. आजअखेर वेल्हे तालुक्यात सरासरी ७५० मि.मि. पावसाची नोंद झाली असून, जुलैअखेर २००० मि.मि. पाऊस होणे अपेक्षित आहे. वेल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अद्याप सरासरी पाऊस न झाल्याने भातलागणीची कामे रखडली आहेत. वेल्हे, विंझर, मार्गासनी, दापोडे, अंबवणे या पंचक्रोशीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही काही ठिकाणी लागणी सुरू आहे.
पश्चिम भागातील ओढ्याकाठच्या खाचरांना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे. मात्र माळरानावरील खाचरांना पाणीच नसल्याने लागवड करता येत नाही. तर पूर्व भागात पेरलेले बी उगविण्यसाठी पाणी देण्याची धडपड शेतकरी करत आहेत. एकतर पावसामुळे पेरणी उशिरा, लावण्या उशिराने होत असून, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पिकांवर होणार असल्याचे शेतकरी सांगतात.
सध्या भाताच्या लागवडीसाठी पावसाची अत्यंत गरज असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या पाण्यावरच सदरची शेती अवलंबून असल्याने पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे.

Web Title: Sowing of rice in absence of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.