पावसाअभावी पेरण्या रखडल्या
By admin | Published: June 27, 2016 01:18 AM2016-06-27T01:18:56+5:302016-06-27T01:18:56+5:30
भोर तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
भोर : भोर तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील धूळवाफेवर पेरलेल्या बियांची चांगली उगवण झाली आहे. वीसगाव खोऱ्यातील रखडलेल्या भातासह इतर बियाण्यांच्या पेरणीला सुरुवात झाली. पूर्व भागातील महामार्गासह आजूबाजूच्या गावातील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी व पेरलेल्या बियांसाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर भाताचे बी पेरून काही भागात एक महिना झाला आहे. काही ठिकाणच्या बियांची चांगली उगवण झाली आहे. मात्र जून महिना संपायला चार दिवस राहिले तरी पावसाने दडी मारल्याने भातासह इतर बी पेरण्यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून झालेल्या रिमझिम पावसामुळे भाटघर व नीरा देवघर धरणभागात भाताच्या पेरण्या होऊन एक महिना झाला असून पेरलेली भाताची रोपे उगवली आहेत. पावसामुळे रोपे चांगली उगवण्यास मदत होणार आहे.
वीसगाव व आंबवडे खोऱ्यात रिमझिम पावसामुळे भातासह इतर पिकांच्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. मात्र पूर्व भागातील महामार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे करून ठेवली असून, शेतकरी दमदार पासवाची वाट पाहात आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतरच बियांची पेरणी करतात. मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात वळवाचे तीन, चार दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवर भाताच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र या वेळी एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचा पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या एक महिना पुढे गेल्या आहेत. नीरा देवघर भागात वळवाचा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताच्या धूळवाफेवरील पेरण्या रखडल्या होत्या. यामुळे बळीराजा चिंतेत असून आकाशाकडे डोळे लावून पावसाची अतुरतेने वाट पाहात आहे.
>भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हेक्टर तर जिरायती क्षेत्र ३०,३०८ हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात सर्वाधिक पश्चिम भागातील हिर्डोशी, भुतोंडे, वेळवंड आणी महुडे खोऱ्याचा समावेश आहे.
या भागाला भाताचे आगार समजतात. नाचणी १५०० हेक्टर, मका ८००, बाजरी २००, ज्वारी १००, भुईमूग ४००० हेक्टर, कारळ ४००, सोयाबीन ३००, कडधान्य १ हजार हेक्टर तर तृणधान्य १०९००, असा एकूण अन्नधान्य ११,९०० हेक्टरवर घेतले जाते.
मात्र पावसाअभावी पेरण्याच रखडल्याने भातासह इतर पिकांच्या पेरण्या एक महिना पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो, असे कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.
>वेल्ह्यात भातरोपे तरारली;
तर पर्यटकांची गर्दी वाढली
मार्गासनी : वेल्हे तालुक्यात पावसाने हळुवारपणे हजेरी लावली असली तरी या पावसाने भातरोपे तरारली असून, तालुक्यात निसर्गसौंदर्य खुलले असल्याने पर्यटकांनी सुट्टीच्या दिवशी गर्दी केली आहे. हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून तुरळक हलक्या तर कधी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वेल्ह्यातील शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातरोपांची १०० टक्के पेरणी झाली असून, पावसाच्या पाण्याने भातरोपे तरारली आहेत, तर तालुक्यात मुख्य पीक भातरोपाबरोबर सोयाबिन, भुईमूग,नाचणी,यांचीदेखील पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.