अकोल्यात सोयाबीनची आवक ३५ हजार क्विंटलवर पोहोचली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:45 AM2018-10-15T11:45:35+5:302018-10-15T11:46:06+5:30
बाजारगप्पा : अकोल्याच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर प्रतिदिन सरासरी नऊ हजार क्विंटल आवक आहे
- राजरत्न सिरसाठ (अकोला)
पश्चिम विदर्भात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून, अकोला जिल्ह्यातील बाजारात दररोज ३५ ते ४० हजार क्ंिवटल आवक सुरू आहे. अकोल्याच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर प्रतिदिन सरासरी नऊ हजार क्ंिवटल आवक आहे; परंतु दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अकोला जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती देत जवळपास दोन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पोषक ठरल्याने सोयाबीन पीक जोमाने वाढले; परंतु फुलोऱ्यावर येण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घ खंड दिल्याने बरड, नदीकाठची, तसेच जेथे कमी पाऊस झाला, तेथे उतारा कमी आला.
बरड व नदीकाठच्या जमिनीत एक ते दीड क्विंटल, जेथे भारी जमीन होती; पण पाऊस कमी झाला, तेथे एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा आला, तसेच भारी जमीन आहे, पाऊस बऱ्यापैकी झाला, अशा ठिकाणी एकरी ५ ते ८ क्विंटल उत्पादन आहे. म्हणजेच यावर्षी पीक चांगले असूनही पावसाने वेळेवर दगा दिल्याने सोयाबीन उत्पादनाचा उतारा असमान आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही यात निघणे कठीण आहे. असे असताना बाजारात मात्र प्रतवारीचे निकष लावण्यात येत असल्याने सोयाबीनचे दर घटले आहेत. मागील पंधरवड्यात प्रतिक्ंिवटल दर सरासरी ३,१०० रुपयांवर पोहोचले होते; परंतु सोयाबीनची आवक केवळ ५० ते ५५ क्ंिवटल होती. या आठवड्यात काढणी सुरू झाल्याने सोयाबीनची आवक वाढली आहे; परंतु आर्द्रता असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी २,६०० रुपये प्रतिक्ंिवटल दराने खरेदी सुरू केली आहे.
या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सरासरी प्रतिक्विंटल दर २,८५० रुपये आहे; पण प्रतवारीचे निकष लावण्यात येत असल्याने दर २,६०० रुपयेच आहे. बुधवारी येथे ९,८४६ क्ंिवटल, तर गुरुवारी ६,८०५ क्ंिवटल सोयाबीनची आवक होती. म्हणजेच गुरुवारी दर घटताच सोयाबीनची आवक तीन हजार क्ंिवटल कमी झाली.
दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने सणासुदीच्या दिवसांत अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता जरी दर कमी असले, तरी लवकरच हे दर प्रतिक्ंिवटल ३,१०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता अकोला बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, गुरुवारी बाजारात हरभरा सरासरी चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल, तर आवक ८२१ क्ंिवटल होती. तूर सरासरी ३,६०० रुपये, तर आवक ६४८ क्ंिवटल होती. मुगाचे सरासरी दर ४,९०० रुपये होते; पण आवक ४३६ क्ंिवटल एवढीच होती. उडदाची आवक २८८ होती. दर सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विं टल होते.