Abu Azmi on Raj Thackeray: “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”; अबू आझमींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:30 AM2022-04-05T11:30:03+5:302022-04-05T11:31:00+5:30
Abu Azmi on Raj Thackeray: शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असून, राज ठाकरेंच्या सभेवेळी किती ध्वनिप्रदूषण झाले, याची तपासणी करून पोलिसांनी कारवाई करावी, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथील मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार तोफ डागली. यावेळी मशिदींवरील भोंग्याबाबतही राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडत आक्षेप घेतला. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तरही दिले. तर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. यात आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी उडी घेतली असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडल्याने मनसेतील मुस्लिम पदाधिकारी नाराज झाल्याचे सांगितले जात असून, पुण्यातील पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. यानंतर आता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?
मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का, असा सवाल करत, पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. तसेच मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे.
ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही
वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही. शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही, असे अबू आझमी यांनी सांगितले.