सपाचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा
By admin | Published: December 20, 2015 12:55 AM2015-12-20T00:55:55+5:302015-12-20T00:55:55+5:30
विधान परिषदेच्या मुंबईतील निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने, कॉँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबईतील निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने, कॉँग्रेसचे उमेदवार भाई जगताप
यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेत सपाचे ९ नगरसेवक असल्याने, जगताप यांना विजयासाठी ही मते महत्त्वाची
ठरणार आहेत.
धर्मनिरपेक्षततेच्या मुद्द्यावर जगताप यांचे समर्थन करण्याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाल्याचे, सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले.
विधान परिषदेसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. त्यामध्ये शिवसेनेतर्फे मंत्री रामदास कदम, तर कॉँग्रेसने भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्या शिवाय राष्ट्रवादीतून बंडखोरी करून प्रसाद लाड रिंगणात उभे राहिले आहेत. मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
त्याचबरोबर सपाने शनिवारी पाठिंबा जाहीर केल्याने, जगताप यांना ही बाब फायद्याची ठरणार आहे. देशातील वाढती असहिष्णुता व जातीयवाद लक्षात घेता, धर्मनिरपेक्ष उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे जगताप यांना मतदान करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)