आठ किलोमीटर लांब, जंगलातील पुलाखालीच मिळते इंटरनेट, विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:30 AM2021-06-14T08:30:55+5:302021-06-14T08:31:40+5:30

ऑनलाइन शिक्षणासाठी दररोज आठ किलोमीटर पायपीट; इंटरनेट कव्हरेज मिळण्यासाठी थेट पंतप्रधानांना लिहिले पत्र

space under the bridge became Student's school; akola student tushar muthe wrote letter to PM | आठ किलोमीटर लांब, जंगलातील पुलाखालीच मिळते इंटरनेट, विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधानांना पत्र

आठ किलोमीटर लांब, जंगलातील पुलाखालीच मिळते इंटरनेट, विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधानांना पत्र

googlenewsNext

- मच्छिंद्र देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावातील तेरा वर्षांच्या तुषार मुठेची गावापासून आठ किलोमीटर दूर रस्त्यावर असलेल्या पुलाखालील मोकळ्या जागेत दररोज ऑनलाइन  शाळा भरते. आजूबाजूला  हिंस्त्र श्वापदे असल्याने येथे पालकांना पहारा द्यावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. गावात मोबाइलला नेटवर्क नसल्यामुळे दररोज आठ किलोमीटरची पायपीट तुषार व त्याच्या वडिलांना करावी लागते. 


अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी  फोपसंडी गावातील तेरा वर्षांचा तुषार दत्तू मुठे हा सातवीत आदिवासी शासकीय योजनेतून तालुक्यातील वीरगावच्या आनंद दिघे इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये शिकतोय. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन सुरू असल्याने अभ्यास कसा करायचा, हा प्रश्न तुषारला निर्माण झाला. 


वडिलांनी मोलमजुरी करून एक लॅपटॉप घेऊन दिला. पण, गावात इंटरनेटसाठी नेटवर्क नाही. तुषारने ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत  पत्र लिहिले. तुषार सध्या गावापासून आठ किलोमीटर दूर सातेवाडी परिसरातील एका दरीत डांबरी रस्त्याच्या छोट्या पुलाखालील जागेत रेंज येत असल्याने दररोज सकाळी आठ ते बारापर्यंत लॅपटॉपवर आपले शिक्षण घेतो. आसपासच्या परिसरात रानडुकरे, तरस, बिबटे असे प्राणी असल्याने पालकांना शाळा संपेपर्यंत पहारा द्यावा लागतो. 

मला दररोज मुलाला घेऊन जावे लागते. तेथे दोन ते तीन तास थांबावे लागते. मुलगा इथेच शिकतो आणि गृहपाठही इथूनच करतो.    गावात मोबाइल रेंज आली तर बरे होईल. 
    - दत्तू मुठे, तुषारचे वडील    

मला शिकायचं आहे. होमवर्क व क्लास इथूनच करावे लागतात.  त्यात कधी रेंज गेली किंवा कमी झाली तर तास बुडतो. मी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ते नक्की आमच्या गावात रेंज आणतील.  
    - तुषार मुठे, विद्यार्थी 

२० वर्षांपूर्वी आली गावात वीज 
फोपसंडी अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम गाव. येथे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यामुळे वीज आली व रस्ता झाला. सध्या या गावाच्या दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे इंटरनेट नेटवर्क नाही.

Web Title: space under the bridge became Student's school; akola student tushar muthe wrote letter to PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.