शाब्बास नेतेहो... असेच वागा..! असेच बोला..!!
By अतुल कुलकर्णी | Published: February 20, 2022 07:13 AM2022-02-20T07:13:52+5:302022-02-20T07:14:09+5:30
गेल्या काही वर्षांतील राजकारणावर नजर टाकली, तर मला आत्ताचे राजकारण जास्त सरस आणि दमदार वाटू लागले आहे... सर्वपक्षीय नेत्यांना पत्र.
अतुल कुलकर्णी
प्रिय सर्वपक्षीय प्रमुख नेतेहो,
मुद्दाम तुम्हाला पत्र लिहायला घेतले आहे. गेले काही दिवस मी रोज सकाळी सगळी कामे सोडून वर्तमानपत्र वाचतोय. त्यामुळे माझे मन प्रसन्न झाले. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या बातम्यांनी मला झालेला आनंद शब्दातीत आहे. मनातल्या मनात मी एकदम खुश झालोय. एका बाजूला सोमय्या, प्रसाद लाड, राम कदम, दुसरीकडे राऊत, अनिल परब तिसरीकडे नाना पटोले, नवाब मलिक, अतुल लोंढे, सचिन सावंत... नावे तरी किती घ्यायची. सगळे एकमेकांच्या विरुद्ध हे असे जोरदार भिडलेले पाहून आपल्याला फार भारी वाटत आहे. काय आपली संस्कृती... तिचा सार्थ अभिमान बाळगत ही सगळी मंडळी किती जाज्वल्यपूर्ण शब्दरचना करत एकमेकांशी वाद प्रतिवाद करत आहेत. कोणाला ‘भ’ची बारखडी पाठ, तर कोणाला ‘म’पासून सुरू होणारे सगळे शब्द पाठ... एवढे पाठांतर तर उभ्या आयुष्यात आम्हाला कधी करता आले नाही. त्याची खंत वाटू लागलीय हेही कबूल केले पाहिजे.
गेल्या काही वर्षांतील राजकारणावर नजर टाकली, तर मला आत्ताचे राजकारण जास्त सरस आणि दमदार वाटू लागले आहे. नाहीतर पूर्वीच्या काळात उगाचच सभ्यतेच्या नावाखाली एकमेकांना मदत करायचे सगळे... त्या सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार होणार होत्या, तर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढलेली मुलगी उभी आहे, म्हणून तिला मदत करणार, असे सांगून टाकले. त्यांचा पक्ष कोणता, यांचा पक्ष कोणता...? प्रतिभाताई राष्ट्रपतीपदासाठी उभ्या राहिल्या त्यावेळीसुद्धा मराठी महिला राष्ट्रपती होत आहे, असे म्हणत चक्क बाळासाहेबांनी त्यांना पण पाठिंबा देऊ केला. आपले पूर्वीचे नेते एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर, बायका मुलांबद्दल चकार शब्द काढायचे नाहीत... आणि आत्ताचे नेते बघा... कसे बिनधास्त सगळ्या गोष्टींवर वाट्टेल तसे बोलतात. पोरी उचलून आणण्याची भाषा करतात, असा दमदारपणा पाहिजे. तो मागच्या काळात कधी दिसलाच नाही. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर.आर. पाटील, गोपीनाथ मुंडे हे नेते असोत किंवा शरद पवार असोत, या नेत्यांना हे असले बोलणे कधी जमलेच नाही. त्यांचा कदाचित अभ्यास कमी पडला असावा. त्यांच्या काळात संजय राऊत, किरीट सोमय्या, राम कदम यांच्यासारखे नेते नव्हते. जरी असे नेते त्यावेळी असले असते तरी ही त्या नेत्यांना ‘भ’ आणि ‘म’च्या बाराखड्यांमधले शब्द वापरता आले असतेच याची कोणतीही खात्री देता येत नाही.
मागे एकदा विलासराव आणि गोपीनाथराव एका व्यासपीठावर होते. रामदास फुटाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. काय गाजली ती. त्यावर अस्मादिकांनी विलासरावांना फोन करून अभिनंदन केले, तर ते म्हणाले, आमच्यामुळे तुमचा टीआरपी वाढला... आम्हाला रॉयल्टी द्या आता... आत्ताच्या नेत्यांनी रॉयल्टी देत कशी नाही, असा दम भरत, चॅनलवाल्यांकडून पैसे वसूल केले पाहिजेत...
आपल्याकडे ना, कसली सभ्यताच राहिलेली नाही. बिहार, उत्तर प्रदेशात बघा बरं कसे सभ्य राजकारणी आहेत. ते कसे बोलतात, कसे वागतात, कसे एकमेकांना बघून घेऊ, अशी भाषा करतात. आपणही आता हळूहळू त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. सुसंस्कृत राज्य म्हणून काही मिळत नाही. उलट त्या राज्यांना बघा, बिमारू स्टेट म्हणून जास्तीचे पैसे मिळतात. आपल्यालादेखील तसा जास्तीचा निधी मिळायला पाहिजे. त्यासाठी सगळ्या नेत्यांनी रोज एकमेकांविरोधात बोलायला पाहिजे. धोबीघाटावर जशा चादरी आपटून- आपटून धुतात ना तसे एकमेकांना धू- धू धुतले पाहिजे. चॅनलवाल्यांशी ॲग्रीमेंट करून त्यांना मिळणाऱ्या टीआरपीमधून, जाहिरातीमधून हिस्सा मागून घेतला पाहिजे. मग बघा कशी मजा येते... माझी सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या नेत्यांना हे असे करायला सांगा... मग बघा, महाराष्ट्राची ख्याती कशी बदलते ते... आपल्याला स्वर्गलोकापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी विचारले पाहिजे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...? असो. तुम्ही हे कराल ही खात्री आहे. थांबतो. आता मला चॅनलवर आरोप- प्रत्यारोप ही बातम्यांची मालिका बघायची आहे. जय महाराष्ट्र.
आपलाच,
बाबूराव