महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?

By वसंत भोसले | Published: May 22, 2022 09:40 AM2022-05-22T09:40:09+5:302022-05-22T09:40:57+5:30

राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात नवनिर्माण करण्याचे राजकारण काय असणार आहे? त्यांचा कार्यक्रम कोणता आहे? त्यांची राजकीय भूमिका कोणती असणार आहे? त्यामध्ये सातत्य असणार आहे का? ते मांडून आग्रह धरला जाणार आहे का? 

spacial article on what is the place of mns chief raj thackeray in maharashtra politics | महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?

googlenewsNext

वसंत भोसले
(लेखक 'लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स‌ंस्थापक राज ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांतून काही महिन्यांपूर्वी मुंबईत जाहीर सभा घेतली आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही लक्ष्य बनविण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले होते की, कधी तरी घराच्या बाहेर येऊन टीकाटिप्पणी करून पुन्हा घरी जाऊन बसतात. त्यांची नोंद कशासाठी घ्यायची? तशीच आज, रविवारी सकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मध्यंतरीच्या काळात ठाण्यातही सभा झाली होती. त्यांच्या सभेचा तो उत्तम इव्हेंट असतो. सभेला अमाप गर्दी पण लोटते. चॅनेलवाले संपूर्ण सभा लाईव्ह दाखवितात. सारा महाराष्ट्र ऐकतो. याविषयी वादच नाही. त्यांची वक्तृत्व शैली आणि जोरदार टोलेबाजीमुळे जुन्या जमान्यातील वादळी नेतृत्वांच्या नेत्यांच्या सभासारखी सभा गाजते. सभा संपल्यानंतर त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे मूल्यमापन केले तर हाती काहीच लागत नाही. विद्यमान महाराष्ट्राच्या वाटचालीवरचे प्रश्न कोणते आणि त्यावर राज ठाकरे यांची राजकीय भूमिका कोणती? लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणते आणि त्यावर मनसेची राजकीय भूमिका अन‌् कार्यक्रम कोणता? याचा थांगपत्ता नसतो. एकूणच काय तर सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचे स्थान काय? पर्यायाने एकमुखी नेतृत्व असलेल्या राज ठाकरे यांचेच स्थान काय आहे? असा सवाल उपस्थित होतो.

महाराष्ट्राचे देशाच्या भौगोलिक परिस्थितीत असलेले स्थान, महाराष्ट्राची जडणघडण आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, औद्योगिक, ग्रामविकास, आदींची परंपरा कोणती आहे? महाराष्ट्राची स्वातंत्र्योत्तर काळात वाटचाल कशी झाली त्यातून मराठी माणसांचे कोणते प्रश्न सुटले आणि नवे कोणते उभे राहिलेत, या सर्व तत्कालीन प्रश्नांवर विविध राजकीय पक्ष -संघटनांनी कोणत्या भूमिका घेतल्या, कोणते कार्यक्रम राबविले आणि त्या-त्या नेतृत्वाने कष्टमय जीवन कसे जगले? याची एक मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राचे भाग्य असे की, स्वातंत्र्य लढ्याच्या विचारमंथनातून तयार झालेल्या यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभले. त्यांची एक व्यापक दृष्टी होती. त्याला राष्ट्रीय संदर्भ होते. तसेच स्थानिक समस्यांवरील उत्तरांची जंत्री होती. यासाठीच ते म्हणायचे की, राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकले पाहिजे. या साध्या सरळ वाक्यात किती मोठा अर्थ दडला होता, याची जाणीव होती. कारण थेट राजकारणात उतरून राज्य आणि राष्ट्र उभारणीचा कार्यक्रम राबविण्याची विषयपत्रिका त्यांच्यासमोर तयार होती. त्यासाठी बेरजेची गणिते मांडली जायची. त्याचा अर्थ फोडाफोडी नव्हती तर राजकारणात सक्रिय असलेली बुद्धीमान पिढी एकत्र करून प्रशासन राबवून विकास साधायचा होता. याच मराठी नेत्यांनी महाराष्ट्र घडविला. परप्रांतातून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्र घडला नाही, अशी भूमिका कधी काळी राज ठाकरे यांनी मांडली होती. आता ते महाराष्ट्राचे वाटोळे झाले, अशी टीका सुरू करताच त्या मराठी नेतृत्वाचे कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरस होऊ लागला. आपणच काही वर्षांपूर्वी (कधी तरी) अशी भूमिका मांडली होती, याची जाणीवही राज ठाकरे यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. 

विद्यमान पंतप्रधान आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना राज ठाकरे यांनी गुजरातचे मॉडेल पाहायला गुजरातचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावरून परतताच नरेंद्र मोदी आणि गुजरात मॉडेलचे तोंड भरून कौतुक केले होते. मात्र, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेला भूमिकाच नसल्यासारखे या पक्षाने निवडणुकाच न लढविण्याची भूमिका घेऊन बसला होता. काही दिवसांनी महाराष्ट्रात दहा मोठ्या जाहीर सभा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि नरेंद्र मोदी यांचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने तत्कालीन पंतप्रधान 

डॉ. मनमोहन सिंग आणि संयुक्त पुरोगामी आघाडीवर (यूपीए) कशी टीका करीत होते. स्वत: पाच वर्षे पंतप्रधानपदी असताना मात्र डॉ. मनमोहन सिंग यांचीच धोरणे राबविली त्याचे जाहीरपणे (त्यांचा उल्लेख न करता) आपणच नवे धोरण कसे आखतो आहोत, देशाला सबका साथ, सबका विकास, या वाटेवर कसे घेऊन जात आहोत, हे सांगण्यावर राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून धुरळा उडवून दिला होता. 

राज ठाकरे यांचे म्हणणे पटत होते. एका मागून एक होणाऱ्या सभांना गर्दी वाढत होती. मात्र, परिणाम शून्य झाला. भाजप- शिवसेना राज्यात युती होती. या युतीने अठ्ठेचाळीस पैकी एकेचाळीस जागा जिंकल्या (भाजप २३, सेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस, एम.आय.एम. आणि अपक्ष प्रत्येकी एक) 

आपली राजकीय भूमिका कायम एकच असावी, असा आग्रह धरणे किंवा त्याचे ओझे एकदा पक्षावर  टाकणे बरोबर नाही. मनसे किंवा राज ठाकरे गुजरातचे मॉडेल पाहून प्रभावीत होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे कौतुक करू शकतात. मात्र, देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांची धोरणे नेमकी उलटी किंवा काँग्रेसचीच धोरणे कशी काय राबवू शकतात? ती नीटही आखली आणि अमलात आणली जात नाही, यावर राज ठाकरे यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. त्यामुळे भूमिका बदलावी लागली असेल. परिणामी टीका करण्यास सुरुवात केली असेल, पण त्या निवडणुकीत मते कोणाला द्यायची याचे उत्तर त्यांनी दिले नाही. किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला देखील पाठिंबा दिला नाही. मनसे या स्वत:च्या पक्षाचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरविले नाहीत. 

अशी कशी काय विचित्र राजकीय भूमिका असू शकते? त्यांच्या दहा  सभा या मनोरंजनप्रधान इव्हेंट‌्स‌ होत्या का? 

मनसे हा पक्ष स्थापन झाला तसा अनेक राजकीय संघटना आणि पक्ष स्थापन झाले. एका मर्यादेपर्यंत वाढले. काळाच्या ओघात संपूनही गेले. मुंबई हे औद्योगिक शहर असल्याने मोठा कामगार वर्ग होता. महाराष्ट्रात सुमारे दहा टक्के आदिवासी समाज आहे. दलित समाजाची संख्याही लक्षणीय आहे. तुलनेने मुस्लिम समाज कमी आहे. शेतकरी वर्ग हा एक मोठा वर्ग राजकारणावर प्रभाव टाकणारा आहे. तो ग्रामीण भागात असल्याने त्या विभागाच्या प्रश्नांशी जोडलेला आहे. या सर्व समाज घटकांच्या प्रश्नांना भिडणारे नेतृत्व महाराष्ट्रात उभे राहिले. त्यांच्या संघटना झाल्या. राजकीय पक्ष उभे राहिले. त्यातील अनेकांनी आपल्या विचारधारावर निष्ठा ठेवून संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. घरावर तुळशीपत्र ठेवले. लोकांचे प्रश्न सोडविले. राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्नही  केला. त्यातील बहुतांश जणांनी पाच-सहा दशके सार्वजनिक जीवनात काम करून भूमिका बदलल्या नाहीत किंबहुना ज्या प्रश्नांसाठी संघर्ष करायचा निर्धार केला होता, त्यात अपयश आले तरी निराश न होता लढत लढत जीवनयात्रा संपविली.

यातील काही नेत्यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. नारायण मेघाजी लोखंडे यांनी तर भारतीय कामगार चळवळीचा प्रारंभ केला. श्रीपाद अमृत डांगे या विद्वान माणसाने वसाहत वादाविरुद्ध जागतिक भूमिका घेऊन देशाचे आणि राज्याच्या राजकारणात भूमिका घेऊन मांडणी केली. संघर्ष केले. चळवळी केल्या. भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने १९२५ मध्ये झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर औद्योगिक कलह कायदा १९४८ मध्ये मांडला तेव्हा सलग दोन दिवसांत अकरा तास पंचवीस मिनिटे त्यांनी या कायद्याचा किस पाडणारे भाषण केले होते. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात हा विक्रम अद्याप कोणी माेडलेला नाही. भूमिहीन दलितांच्या प्रश्नांवर दादासाहेब गायकवाड, कम्युनिस्ट पक्षाचे माधवराव गायकवाड, लाल निशाण पक्षाचे संतराम पाटील, यशवंत चव्हाण, बी. टी. रणदिवे, आदिवासी समाजासाठी गोदाताई परुळेकर आणि श्याम परुळेकर, आदींनी लढा दिला. मराठवाड्याच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ लढले, विदर्भासाठी बापूजी अणे, जांबुवंतराव धोटे संघर्ष करते झाले. 

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून हरितक्रांतीची बिजे पेरली. अलीकडच्या काळात शेतकरी चळवळीचे अध्वर्यू शरद जोशी, माधवराव बोरस्ते, शंकरराव वाघ यांनी वादळ उठविले. मुंबईच्या कामगार वर्गाला संघटित करणारे बंद बहाद्दूर जॉर्ज फर्नांडीस, डॉ. दत्ता आणि दादा सामंत आणि मराठी माणसांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षाची भूमिका घेत वादळ निर्माण केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात युक्रांद, दलित पँथर, हमाल पंचायत, शेतमजुरांची संघटना चालविणारा लाल निशाण पक्ष, धरणग्रस्तांसाठी लढणारे नागनाथआण्णा नायकवडी, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील, त्यांनीच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज पोट भरण्यासाठी मुंबईत माथाडी कामगार म्हणून हमाल होऊन घाम गाळला त्यांना आण्णासाहेब पाटील यांनी लढवय्या नेत्याचे नेतृत्व दिले. अशा कितीतरी माणसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा दबाव गट म्हणून काम केले. दलित पँथर चळवळीची जगाने नोंद घेतली. त्याची तुलना अमेरिका आणि आफ्रिकेतील काळ्या लाेकांच्या चळवळीशी केली. त्यांनी मराठीतील प्रस्थापित साहित्याला धक्का देणारी नवी बंडखोर परंपरा निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार आधुनिक महाराष्ट्रात नव्या स्वरूपात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

अशा या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि त्यांचा मनसे या राजकीय पक्षाचे मूल्यमापन कसे करायचे ? तरी देखील अस्वस्थ असलेली जनता एका आशेने ते जे माणसांच्या मनातील असंतोषाचे स्पंदन मांडतात, ते ऐकायला जात असतात. मात्र, त्यांच्या हाती काय पडते? भोंगा हटवा ! भारताला लागलेल्या हिंदू-मुस्लिम रक्तरंजित हिंसक भांडणाच्या शापाला फुंकर घालण्याची रणनीती मांडणार का ? या चुकातून आपण बाहेरच पडणार नाही का? मुस्लिम हाच आपल्या देशाची समस्या आहे का? जात-धर्म हे वास्तव असले तरी त्यांच्या संघर्षातून रक्तच सांडले आहे. नवे काही उभारलेले नाही. भोंगा हटविण्याची मुदत दिलेला दिवस उगवला त्यादिवशी महाराष्ट्रात शांतपणे व्यवहार झाले. हेच लोकांनी दिलेले सकारात्मक उत्तर होते. युक्रेनसारखा धान्याचे कोठार असलेला देश वर्चस्ववादातून राखरांगोळी होताना आपण पाहतो आहे. तेव्हा त्या देशाचे राष्ट्रप्रमुख म्हणतात, एकेदिवशी हुकूमशाह (वर्चस्ववाद घालणारे) मरून जातील आणि जगात शांतता पुन्हा प्रस्थापित होत जाईल.

भारताचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातील विरोधाभास मिटविणारे, समाजाला पुढे घेऊन राजकारण करायचे की, भडकावू भाषण पेरत भावनिक राजकारण करायचे! काळाच्या ओघात ते टिकणारे नाही. युक्रेनच्या कहाण्या रोज जनतेला दिसतात. ऐकता येतात. वाचायला मिळतात. आता जग एका अंधारात, अज्ञानात आणि दुर्लक्षित अवस्थेत वाटचाल करीत नाही. दक्षिण आफ्रिकेतील मोहनचंद करमदास गांधी यांचा लढा पुढे भारताच्या लढ्याची प्रेरणा ठरला. त्याला फार कालावधी लागत होता. कारण जगाच्या माहिती प्रसाराचा वेगच कमी होता. आता त्याला गती आली आहे. राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात नवनिर्माण करण्याचे राजकारण काय असणार आहे? त्यांचा कार्यक्रम कोणता आहे? त्यांची राजकीय भूमिका कोणती असणार आहे? त्यामध्ये सातत्य असणार आहे का? ते मांडून आग्रह धरला जाणार आहे का? सनसनाटीपणा हा सध्याच्या प्रसारमाध्यमांचा स्थायीभाव झाला आहे. त्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात. तो पाण्यावरील बुडबुड्यासारखा आहे. क्षणात फुटून जातो आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणाऱ्या मनसेला पर्यायाने राज ठाकरे यांना स्थान निर्माण होईल का? कोणत्याही वर्गाच्या किंवा समाजाच्या प्रश्नाला न भिडता केवळ हिंदुत्वाचे भावनिक राजकारण चालणार नाही. त्यावर पोट भरत  नाही. लष्कर भाकरीवर चालते म्हणतात. तो लष्कराच्या पराक्रमाचा अवमान नसतो. वास्तव असते. आपण वास्तव कधी स्वीकारणार आहात, की महाराष्ट्राचे मनाेरंजनकार होणार आहात, याचा निर्णय अपेक्षित आहे.

Web Title: spacial article on what is the place of mns chief raj thackeray in maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.