"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:36 AM2023-04-22T09:36:34+5:302023-04-22T09:37:17+5:30

आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली.

"Speak Modi-Shah! No war, no Buddha, at least speak the language of resistance"; Criticism of the Thackeray group over the attack in Kashmir | "मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका

"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका

googlenewsNext

मुंबई : गेल्या गुरूवारी अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, यावरून ठाकरे गटानेही मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र त्यावर पंतप्रधान काहीही बोलले नाही. आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकार ३६५ दिवस निवडणुकांच्या राजकारणात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याच्या कारस्थानात अडकून पडले आहे. त्यामुळे पुलवामा, उरी, पठाणकोटपासून कालच्या पुंछ-जम्मू मार्गापर्यंत आमच्या जवानांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. २०१६ मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळ्या पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र त्यावर पंतप्रधान काहीही बोलले नाही. आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

देशाचे गृहमंत्री व भक्तांचे ‘प्रतिपोलादी पुरुष’ अमित शाह हे कामाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भार त्यांच्यावर आहे. पुन्हा २०२४ आधी देशातील सर्व विरोधी पक्ष मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला पुन्हा विजयी करायचे या कामातही ते व्यस्त आहेत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री व पंतप्रधान राजकीय कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरात लष्कराच्या वाहनांवर बॉम्ब फेकले. त्यात आपल्या पाच जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले.

काश्मीर खोरे शांत नाही व दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत हे पुन्हा उघड झाले. पुंछ-जम्मू मार्गावर दहशतवादी आपल्या जवानांवर बॉम्बहल्ले करीत असताना आपले पंतप्रधान दिल्लीत जागतिक बौद्ध शिखर परिषदेत भाषण देत होते. यावेळी पंतप्रधानांनी जगाला सांगितले, "भारत युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या मार्गावरूनच वाटचाल करतोय." बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे. त्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण काश्मीर खोऱ्यात दहशतवादी जो हिंसाचार रोज घडवीत आहेत, तो शांततेच्या मार्गाने खरंच संपवता येईल काय? असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला.

काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदी सरकावर हल्लाबोल
काश्मीरात ३७० कलम हटवूनही हिंसाचार थांबलेला नाही व शांतता नांदताना दिसत नाही. कश्मिरी पंडितांच्या 'घर वापसी'चे वचनही हवेत विरले. उलट सरकारी कर्मचारी असलेल्या पंडितांना कार्यालयात घुसून अतिरेकी ठार करीत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात पंडितांनी जम्मू आणि श्रीनगरात आंदोलन केले, पण सरकारतर्फे कोणीही पंडितांचे साधे निवेदन स्वीकारायला गेले नाही. हे हिंदू पंडितांचे दुर्दैवच म्हणावे लागेल', अशा शब्दांत काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला निशाणा साधला आहे.

याचबरोबर, भारताच्या दुष्मनांना धडा शिकवू, गोळीला गोळीने उत्तर देऊ, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवू, पाकने गिळलेला कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू व ते करण्याइतकी ५६ इंचाची आपली छाती असल्याचे पंतप्रधानांकडून छातीठोकपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कश्मीरच्या भूमीवर आणि लडाख, अरुणाचलच्या भूमीवर उलटेच घडताना दिसत आहे. मोदी हे कालपर्यंत युद्धाची भाषा करीत होते, ते आता बुद्धाची भाषा बोलू लागले. सत्य सांगायचे तर पाकड्यांसमोर ते युद्धाची भाषा करतात, पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो, असा टोलाही ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.  

ईडी, सीबीआय मोदींची शस्त्रे
भारताची संस्कृती अतिथी देवो भवची आहे. लडाख, अरुणाचलमध्ये घुसलेले आणि काश्मिरात घुसून आपल्या जवानांवर हल्ले करणारे अतिथीच आहेत असे मानावे काय? असा सवाल करतानाच देशाला मजबूत पंतप्रधान आणि कणखर गृहमंत्री लाभलेले असताना लष्काराच्या छावण्यांवर, लष्कराच्या वाहनांवर हल्ले करण्यास धजावतात. म्हणजे काही तरी घोटाळा नक्की आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर ही मोदी आणि शाह यांची शस्त्रे आहेत. पण त्यांना चिनी आणि पाकिस्तानी अतिथी घाबरतात असं दिसत नाही.

जम्मू-काश्मीरचे विभाजन केले. त्यांचा पूर्ण राज्याचा दर्जा काढला. चार वर्ष झाली. पण अजूनही केंद्र सरकार तिथे निवडणुका घ्यायला घाबरत आहे. निवडणुकांशिवायच राज्य करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका करतानाच काल काश्मीरमध्ये हल्ला झाला. मोदी त्यावर तरी काही बोलतील का? युद्धाची भाषा नको, बुद्धाची भाषा नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. नाही तर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा. काय सांगावं, दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही करण्यात आली आहे.

Web Title: "Speak Modi-Shah! No war, no Buddha, at least speak the language of resistance"; Criticism of the Thackeray group over the attack in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.