अध्यक्षांसाठी आमदारांचा सूर फिका

By admin | Published: January 18, 2017 03:35 AM2017-01-18T03:35:39+5:302017-01-18T03:35:39+5:30

रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार

Speaker of the Assembly | अध्यक्षांसाठी आमदारांचा सूर फिका

अध्यक्षांसाठी आमदारांचा सूर फिका

Next

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार हे स्पष्ट झालेले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रयत्न करणारा मी कोण, ज्यांनी त्यांना अध्यक्षपद दिले तेच उमेदवारीबाबत ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लाड यांच्या बोलण्यातला सूर हा टोकरे यांच्या पथ्यावर पडेल असा मुळीच जाणवला नाही.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. विशेषत: सध्या कर्जत तालुक्यावर सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. कर्जतचे विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्यांना मतदार संघ राहिलेला नाही. त्यामुळे टोकरे नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि त्यात जर त्याने अध्यक्षपद भूषविले असेल, तर त्याचे प्रमोशन आमदारकीसाठी होते, असा राजकीय इतिहास सांगतो. कर्जत तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे आमदार आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत कर्जत तालुक्यात विकासकामांच्या जोरावर चांगली बांधणी केली आहे. नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही त्यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत, तसेच आमदार सुरेश लाड यांनीही आमदार निधीच्या माध्यमातून विकास केला आहे. रिलायन्सच्या बेकायदा पाइप लाइन विरोधातही त्यांनी आंदोलन छेडले आहे. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक तालुकाभर पसरवित आहेत. दोन्ही नेत्यांना अफाट राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी कशा बसणार हाही मोठा प्रश्नच आहे.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा मतदार संघ आहेत. टोकरे यांना मतदार संघ शिल्लक राहिलेला नाही. टोकरे खांडस मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जाते, परंतु हा मतदार संघ शेकापच्या ताब्यात आहे. शेकाप त्यावरील हक्क सोडणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टोकरे यांना कोणत्या मतदार संघातून उमेदवारी देणार असे त्यांना विचारले असता, ओसवाल म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि स्थानिक आमदार सुरेश लाड हे ठरवतील.
टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही लाड बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.
>‘कर्तृत्ववान व्यक्तीला कोणीच रोखू शकत नाही’
टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही सुरेश लाड यावेळी बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.

Web Title: Speaker of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.