विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांचा अविश्वास , सापत्न वागणुकीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:25 AM2018-03-06T06:25:53+5:302018-03-06T06:25:53+5:30

विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या आहेत.

 The Speaker's accusation of the opponents of the Speaker | विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांचा अविश्वास , सापत्न वागणुकीचा आरोप

विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांचा अविश्वास , सापत्न वागणुकीचा आरोप

Next

मुंबई - विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आपणास बोलू दिले जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून भाजपा सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची सूचना केली. अजित पवारांनी ती तात्काळ मान्य करत, कामकाज सुरू करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
तहकुबीमुळे संतापलेल्या विरोधकांची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. त्यात अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. विधिमंडळाचे सभागृह सार्वभौम असून विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना मते मांडण्याची संधी द्यायला हवी. परंतु बागडे यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षासारखी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची वागणूक हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. सत्तेतील शिवसेना कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पाबाबत सभागृहात चर्चा झाली नव्हती. पण त्यावर त्याच दिवशी उद्योगमंत्र्यांनी जे उत्तर दिले होते ते त्यांच्या पक्षाच्या अंगलट आले. म्हणून आज सुभाष देसाई यांनी त्या विषयावर निवेदन केले. पण मुख्यमंत्री फडणवीस शोकप्रस्ताव मांडत असताना तो बाजूला सारुन उद्योगमंत्र्यांनी निवेदन केले.

आता पुढे काय?

अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडला गेला, तर त्याचा निर्णय होईपर्यंत अध्यक्षांनी सभागृहात येऊ नये आणि त्या काळात उपाध्यक्षांनी कामकाज पाहावे, असे संकेत आहेत. मात्र, या सरकारने शिवसेनेला उपाध्यक्षाचे पद मिळेल, म्हणून तेही भरलेले नाही. त्यामुळे आता तालिका अध्यक्षांनी या काळात काम पाहावे आणि संकेतांचे पालन करावे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली.

महसूलमंत्र्यांनी काढली औकात!
भाजपा आणि संघ परिवाराच्या विचारधारेवर झालेल्या टीकेमुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी अक्षरश: पारा चढला. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यावरून आपण भाजपाच्या विचारधारेवरच बोट ठेवले. त्यामुळे चिडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी अंगावर धावून जात, ‘तुझी औकात काय? तुला बघून घेईन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.

Web Title:  The Speaker's accusation of the opponents of the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.