सभापतींकडून दुजाभाव, विरोधक झाले आक्रमक; विधान परिषदेचे कामकाज दोनदा करावे लागले तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:26 IST2025-03-20T08:25:11+5:302025-03-20T08:26:14+5:30
आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला.

सभापतींकडून दुजाभाव, विरोधक झाले आक्रमक; विधान परिषदेचे कामकाज दोनदा करावे लागले तहकूब
मुंबई : विधान परिषदेत बुधवारी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव आणल्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाल्याने कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर तालिका सभापतींनी कामकाज रेटून नेले. त्यामुळे सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. तर, सभापतींच्या निर्णयाला आक्षेप घेणे हा त्यांचा अपमान असल्याचे सांगत सत्ताधारी पुढे सरसावले. त्यामुळे गोंधळामुळे कामकाज तहकूब केले.
आजपासून काळ्या फिती
मुख्यमंत्री, सभापती असतानाही सभागृहात विरोधी पक्षाला भूमिका मांडण्याची संधी दिली नाही. गुरुवारपासून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहोत.
मात्र, सभापतीच्या खुर्चीवर ज्यावेळी उपसभापती असतील त्यावेळी मविआचा एकही आमदार सभागृहात बसणार नाही, असे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले.
सभापती शिंदेंविरुद्ध अविश्वास ठराव
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह १४ आमदारांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.