"ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली...", राज ठाकरेंनी मानले 'त्या' हातांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 03:14 PM2023-05-28T15:14:38+5:302023-05-28T15:15:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं.
New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान या वास्तूचं उद्धघाटन करणार म्हणून विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. देशभरातील विविध राजकीय पक्षाचे नेते आपापली मतं मांडत आहेत. विरोधक लोकशाहीचा दाखला देत मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत, तर सत्ताधारी भाजप हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हणत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन संसदभवनावरून लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्यांचे आभार मानले आहेत.
राज ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो."
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2023
ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं.
असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं…
पंतप्रधान मोदींकडून सर्व भारतीयांना शुभेच्छा
नव्या वास्तूचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित केले. भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
देशाचा आणि जनतेचा विकास ही आपली प्रेरणा
पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या ९ वर्षांत देशात ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि ११ कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.