राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? CM फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनी मिळून नऊच्या भोंग्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:39 IST2025-02-24T17:17:23+5:302025-02-24T17:39:51+5:30

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

Speaking about the meeting between Raj Thackeray and Uddhav Thackeray CM Devendra Fadnavis has taken a dig | राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? CM फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनी मिळून नऊच्या भोंग्याला..."

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? CM फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनी मिळून नऊच्या भोंग्याला..."

CM Devendra Fadnavis on Raj-Uddhav Thackeray Meet: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील एका लग्न समारंभात एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. दोन महिन्यात तिसऱ्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर बोलताना टोला लगावला आहे. तसेच राज्यात सुसंवाद असला पाहिजे असं म्हटलं. 

राजकीयदृष्ट्या दुरावलेले दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रविवारी संध्याकाळी अंधेरी भागातील सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकत्र दिसले. लग्नसोहळ्यादरम्यान राज ठाकरे यांनी  उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले आणि रश्मी ठाकरे राज ठाकरेंसोबत हसताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. या भेटीनंतर अनेक चर्चाना उधाण आलं आहे.

यावरुनच माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यात कोणीही कोणासोबतही सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेल. विसंवाद असू नये सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा. आपणही सगळ्यांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातील संवादाची प्रकृती सुधारेल. जसे ५० टक्के ते दोषी ते आहेत तसे ५० टक्के दोषी तुम्ही देखील आहात," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दोन महिन्यात तिसऱ्यांदा भेट

दरम्यान, १५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दादर येथील राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात दोघेही एकत्र आले होते. त्यानंतर आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथील महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही भाऊ दिसले. दोन महिन्यांत तिसऱ्यांदा ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे दोघेही पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Speaking about the meeting between Raj Thackeray and Uddhav Thackeray CM Devendra Fadnavis has taken a dig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.