राज्य सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 05:07 PM2020-11-25T17:07:34+5:302020-11-25T17:07:46+5:30

तीन पक्षांमध्ये कुरघोड्याच अधिक, विजबिलांबाबत सरकारचे घुमजाव 

Speaking against the state government is not 'Maharashtra treason': Devendra Fadnavis | राज्य सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे : देवेंद्र फडणवीस 

राज्य सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे : देवेंद्र फडणवीस 

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात केला वेळकाढूपणा

पुणे : सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे आणि शिवसना म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असून जुन्या कामांना स्थगिती देणे एवढेच काम या सरकारला उरले आहे. कोरोना काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

फडणवीस पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, विजबिलांबाबत सरकारने घुमजाव केले आहे. या सरकारची एक वर्षात एकही उपलब्धी नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीग्रस्ताना जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. पंचनामेही अर्धवट आहेत. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. बैठकांना बोलावण्यात आले नाही. विरोधकांनी केलेल्या सूचननेवर कारवाई केली जात नाही. सरकाराबाबत जनतेसह पदवीधर आणि शिक्षकांमध्ये असंतोष असून हा असंतोष संघटित झालेला पदवीधरच्या निवडणुकीत दिसेल असे ते म्हणाले.
------
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात विरोधक राजकारण करीत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली. त्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल घेतली हे काही कमी नाही. 
-------
जयंत पाटलांनी पराभव मान्य केला... 
भाजपाने बोगस नोंदणी केल्याचे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. ईव्हीएम मशीनवर आरोप करता येत नाही म्हणून 'कव्हर फायरिंग' केले जात आहे. हा आरोप म्हणजे पुणेकर मतदारांवर अविश्वास दाखविण्याचाच प्रकार आहे.
------
सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. हे अनैसर्गिक सरकार असून ज्या दिवशी ते पडेल; त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 
------

संजय राऊत यांना टोला... 

संजय राऊत यांनी १२० लोकांची यादी द्यावीच. आम्ही त्या यादीची वाट पाहतो आहोत असे प्रतिआव्हानही फडणवीस यांनी दिले. प्रताप सरनाईक माध्यमांना बाईट देताहेत, सामना कार्यालयात जातात, पण ईडीसमोर जात नाहीत. ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा ते इतरत्र पळत आहेत.
------
महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणा केला. ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली; त्याच खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करून स्थगिती उठवण्याची मागणी केली. आरक्षणावर घटनापीठ समिती स्थापन करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली असून प्रत्येक पातळीवर महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Web Title: Speaking against the state government is not 'Maharashtra treason': Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.