मनमोकळेपणाने बोलले, तरी राष्ट्रद्रोहाचे आरोप : कोत्तापल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 01:42 AM2016-03-13T01:42:56+5:302016-03-13T01:42:56+5:30
देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी
पुणे : देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बदलत्या काळाच्या ओघात युक्रांदच नव्हे, तर अनेक सामाजिक चळवळी निस्तेज झाल्या आहेत. या सर्वाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता केवळ समाजवादी नेते राहिले असून त्यांचे अनुयायी आहेत तरी कुठे, असा सवालही उपस्थित केला.
प्रा. विजय दर्प यांनी लिहिलेल्या ‘युक्रांदचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, कॉँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. अंजली सोमण, पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘युक्रांदने राज्यात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवनार्चे काम केले आहे. युक्रांदने युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन केले आहे. आंदोलने उभारून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मात्र, कालांतराने युक्रांदच नव्हे, तर अनेक चळवळी नाहीशा झाल्या. त्यामुळे सध्या या चळवळींचा शोध घेतला पाहिजे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदसारख्या चळवळीची आवश्यकता आहे. त्यातून येणाऱ्या पिढीला नैतिकतेच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. तसेच त्यातून नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहण्यासाठी उपयोग होईल.’’
डॉ. सोमण यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. प्रा. दर्प यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
> सध्या देशात मोठ्या प्रमाणात जातीयता आहे. त्याला कारणीभूत माणसाच्या विचारातील तीव्र स्मृतिघटक आहेत. हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म यांत संबंध नाही. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करणे हा काही लोकांसाठी सत्ता मिळविण्याचा मार्ग झाला आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिंदू धर्म माहीत नसून, ते आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय संस्था केवळ सत्ता हाती असल्याने सामाजात धिंगाणा घालत असतात.
- डॉ. कुमार सप्तर्षी