रुग्णाशी बोलत-बोलत हृदयशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:46 AM2017-07-20T00:46:15+5:302017-07-20T01:06:46+5:30

‘सीपीआर’मधील डॉक्टरांची कामगिरी : महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत एकही पैसा न घेता उपचार

Speaking-talking cardiac surgery with the patient | रुग्णाशी बोलत-बोलत हृदयशस्त्रक्रिया

रुग्णाशी बोलत-बोलत हृदयशस्त्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : रुग्णाला केवळ शुद्धीत ठेवून नव्हे, तर बोलत-बोलतच त्याच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्याची कामगिरी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मधील डॉक्टरांनी करून दाखविली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारी रुग्णालयामध्ये अशाप्रकारे अपवादात्मक शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले.
गफूर सौदागर (वय ६५) यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने १८ जूनला सीपीआरमधील हृदयरोग विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या तीन रक्तवाहिन्या ९० टक्के आणि एक रक्तवाहिनी १०० टक्के ब्लॉक असल्याने त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते; परंतु सातत्याने केलेल्या धूम्रपानामुळे त्यांच्या फुप्फुसांची अवस्था नाजूक होती. त्यामुळे त्यांना पूर्ण बेशुद्ध करून शस्त्रक्रिया करण्यामध्ये धोका होता. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देणेदेखील धोक्याचे होते. अखेर हृदयरोग विभागप्रमुख डॉ. रणजित जाधव यांनी संपूर्ण भूल न देता त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि सौदागर यांच्याशी बोलत बोलत त्यांच्यावर अडीच तासांत ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
सौदागर हे रिक्षाचालक आहेत. पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, चार नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. मात्र, परिस्थिती अतिशय हलाखीची आहे; परंतु महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत एकही पैसा न घेता ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. हेमलता देसाई, सहकार्य करणारे डॉ. माजिद मुल्ला, डॉ. सचिन पाटील, डॉ. रणजित पवार, संजीवन शास्त्रज्ञ अरुण पाटील, उदय बिरांजे, विनायक चौगुले यांच्या पथकाने १२ जुलैला ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.


..नाही तर आत्महत्याच करावी लागली असती
‘असल्या आॅपरेशनला आम्ही कुठनं पैसे आणणार होतो सांगा’ असा प्रतिप्रश्न करत यावेळी गफूर सौदागर यांनी ‘सीपीआर’ आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गेली काही वर्षे त्रास होता. सीपीआरमध्येच उपचार घेत होतो. मात्र, हे आॅपरेशन झाले नसते तर मला आत्महत्याच करावी लागली असती, या सौदागर यांच्या उद्गाराने उपस्थितांची मने गलबलून आली.


तरुण आहात, रिस्क कशाला घेता
अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर काहीजणांनी सरकारी रुग्णालयात एवढी ‘रिस्क’ कशासाठी घेता, अशी विचारणा केली. एवढ्या तरुणपणी असा धोका पत्करू नका, असा सल्लाही देण्यात आला. मात्र, आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याचे डॉ. रणजित जाधव यांनी सांगितले.


हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला पूर्ण भूल देणे आवश्यक असते. मात्र, सौदागर यांच्याबाबत तो धोका ठरला असता. त्यामुळे केवळ शस्त्रक्रिया होणाऱ्या भागापुरती भूल देण्यात आली. एकीकडे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असताना त्यांना वेदना होत नव्हत्या आणि त्यामुळे ते बोलूही शकत होते.
- डॉ. हेमलता देसाई, भूलतज्ज्ञ



सर्वसाधारणपणे रुग्णाला बेशुद्ध करून आणि त्याचे हृदय बंद स्थितीत ठेवून त्याच्यावर हृदयशस्त्रक्रिया केली जाते; परंतु या रुग्णाला भूल देणे धोक्याचे असल्याने आमच्या पथकाने शुद्धीतच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी केला. डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असलेली ही शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व पथकाचे काम अभिनंदनीय आहे.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

Web Title: Speaking-talking cardiac surgery with the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.