मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं गणेशोत्सव मंडळांना विशेष आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 07:57 PM2017-08-12T19:57:39+5:302017-08-18T14:54:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले.
पुणे,दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले.
येत्या 2022 साली देश अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्याचा नारा दिला त्याचा उपयोग सुराज्यासाठी करण्याचा विचार करावा असेही ते म्हणाले. महानगरपालिकेच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिन्याभर आयोजित विविध उपक्रमांचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
वादाला पूर्णविराम
लोकमान्य टिळक, खासगीवाले, बिनीवले, पाटणकर, भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. एक राजकीय विचार घेऊन टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तरीही टिळकांसह सार्वजनिक गणेशोत्सवात एकत्रित आलेल्यांचे योगदानही नाकारता येत नाही. आज देशावर विविध संकटांचे सावट आहे, सामाजिक बांधिलकी जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सवातील उद्भवलेल्या टिळक आणि शिवराय या वादाला मी पूर्णविराम दिला असल्याची जाहीर स्पष्टोक्ती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. दरम्यान, यावेळी महापौर, पालकमंत्री यांनी भाषणात भाऊसाहेब रंगारी यांचे आवर्जून नाव घेतले, मात्र मुख्यमंत्र्यांनी रंगारी यांचा उल्लेख टाळला.
मुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना प्रेमळ सल्ला
कायदा पाळा पण जरा प्रेमाने,कारण हा एक सांस्कृतिक उत्सव आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना मृदू भाषेत सल्ला दिला. मात्र हे सांगताना काहीही करण्याची परवानगी मंडळानाही नाही, अशी समजही त्यांनी यावेळी मंडळांना दिली.