मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी ठाणे पालिकेची विशेष व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 04:15 AM2016-10-17T04:15:47+5:302016-10-17T04:15:47+5:30
मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाणे शहरात लाखोंचा जनसमुदाय एकवटणार म्हणून ठाणे महापालिकाही दक्ष होती.
ठाणे : मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाणे शहरात लाखोंचा जनसमुदाय एकवटणार म्हणून ठाणे महापालिकाही दक्ष होती. स्वच्छता ठेवण्यासाठी आणि मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी ठिकठिकाणी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. साफसफाईसाठी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या २५०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी दादोजी कोंडदेव क्रीडागृहही सज्ज ठेवण्यात आले होते. मराठा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजातील स्वच्छता निरीक्षक सज्ज तर होतेच, शिवाय त्यांच्या दिमतीला ठाणे महापालिकाही सज्ज होती. ज्याज्या मार्गावरून मोर्चा पुढे सरकला, त्यात्या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली होती.
पालिकेने मल्हार सिनेमा, कोर्टनाका, जांभळीनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी २०० विशेष टॉयलेटची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. तसेच या मार्गावरील प्रत्येक खाजगी, शासकीय शाळांना आणि हॉटेलवाल्यांनाही विशेष सूचना देऊन त्यांच्याकडील स्वच्छतागृहे वापरू देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय, मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या लाखोंपेक्षा अधिक असल्याने दादोजी कोंडदेव क्रीडागृहदेखील मोर्चेकऱ्यांसाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.