पोलिसांचा ताण कमी होईल, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:43 IST2025-02-16T05:41:39+5:302025-02-16T05:43:18+5:30

पोलिसांची टिंगलटवाळी करणाऱ्या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलिस-मित्र म्हणून काम करणे जरूरीचे आहे. गणपती, मोहर्रम, नवरात्र उत्सव यांसारख्या उत्सवांसाठी पोलिसांनीही पोलिस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

special artical on maharashtra police The pressure on the police will be reduced, but | पोलिसांचा ताण कमी होईल, पण...

पोलिसांचा ताण कमी होईल, पण...

प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक

बई पोलिसांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार २०२२ पासून आतापर्यंत कर्तव्यावर असताना  ३७९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ३७९ पैकी ३३४ पोलिसांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तर २३ जणांचा अपघाती व २२ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही पुढे येऊन यातील प्रत्येक घटनेच्या पार्श्वभूमीची आणि कारणांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. अशाच घटना महाराष्ट्रातील इतर भागांतही सतत होत असतात.

पोलिसांच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे यासाठी समाजातील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलिसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी सुरू ठेवता यावी, यासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्या राजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा, यासाठी या पोलिस अधिकाऱ्यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलिसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही सर्व कर्मचारी हे आपले सहकारी आहेत असेच त्यांच्याशी वर्तन ठेवणे गरजेचे आहे. थोड्याशा कारणाने त्यांना शिक्षा करणे, अपमान करणे हे शिस्तबद्ध खात्यास लाजिरवाणे आहे.

याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणाऱ्या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशांतून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलिसांचा पांडू हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, हा उद्देश असतो.

पोलिसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांतील पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज १२ तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्या वेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.  

यावरील उपाय म्हणून पोलिसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, पौष्टिक आहार परवडणऱ्या किमतीत उपलब्ध करणे, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. सल्लागारांची मदत घेऊन मानसिकरीत्या दुर्बळ पोलिसांना वेळोवेळी वैद्यकीय मदत देणे जरूरीचे आहे. कोणताही पोलिस कर्मचारी अथवा अधिकारी नेहमी समूहात राहील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन (दिशा) १०५६ ची माहिती प्रत्येक पोलिस स्थानकात लावणे सक्तीचे करण्यात यावे. प्रशिक्षण काळात तसेच वेळ मिळेल तेव्हा रामायण, भागवत यासारख्या ग्रंथांचे परिशीलन करण्यास आध्यात्मिक गुरूंच्या साहाय्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पूर्वी यातील गोष्टी सहज कानावर पडत असत. त्यातून फार मोठी आध्यात्मिक मदत मिळत असते व त्यामुळे अपयशाने माणूस खचून जात नाही.

 कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई केली तरीही त्यांना निलंबित करावे, ही मागणी कितपत योग्य आहे, याचा धर्म, जात, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनाच मदत होईल असे नव्हे, तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.

Web Title: special artical on maharashtra police The pressure on the police will be reduced, but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.