एक तरी वारी... अनुभवावी घरोघरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:28 AM2021-07-19T08:28:49+5:302021-07-19T08:36:02+5:30
आपण नाइलाजाने का होईना पंढरपूरची वारी करू शकत नसलो तरी घरी राहून जवळपासच्या लोकांमध्ये ‘वारकरी’ पाहून त्यांची सेवा करूया. अशी ही सेवा तर साक्षात पंढरीच्या विठोबालाही जास्त आवडून जाईल. २० जुलै रोजी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त सेवाभावातला पांडुरंग...
महाराष्ट्राची वैभवी परंपरा असलेली व लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची ‘आषाढी वारी’ म्हणजे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. मात्र सध्याच्या एकूणच परिस्थितीमुळे यंदाही वारी नेहमीच्या पद्धतीने, लाखोंच्या समुदायाने टाळ-मृदंगाच्या गजरात जात नसून सुरक्षेचे नियम पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जात आहे. गेल्या वर्षीही वारी अशीच झालेली. त्याची खंत प्रत्येकाला आहे. मात्र सध्या तरी धोका पत्करण्यात अर्थ नाही हेही तितकेच खरे.
मागे पदार्थ जाला तो बरा।
परी आतां तरी विचार धरा।
यदर्थी तटावला तोचि खरा।
रामीरामदास म्हणे ।।
सारांश : याआधी जे काय झाले ते झाले, पण आता तरी तू विचार कर. यामध्ये (परमार्थामध्ये) धैर्याने टिकला तोच खरा! असं मला वाटते. त्यामुळे मनाशी दुःख न बाळगता आताही आपण वारीचा आनंद कसा घेऊ शकतो हे पाहणे जास्त श्रेयस्कर! सेवाभावातला पांडुरंग आपल्याला सहज दिसू शकेल. वारीला जाता आले नसले, तरी सेवाभाव जागवत भक्तांना मनामनातील पांडुरंग जपता येऊ शकतो, हे मी स्वानुभवाने सांगतो.
ठराविक दिवसांची वारी तर एक निमित्त आहे. त्या दिवसाव्यतिरिक्त अगदी वर्षभर आपण वारीचा आनंद घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर त्यातून जो आत्मानंद मिळतो, तो प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याइतकाच उच्च असतो.
मी स्वतः काही वर्ष पुणे ते सासवड अशी वारी केली आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजातील वंचित घटकांमध्ये पांडुरंग पाहून त्याची जमेल तशी सेवाही केली आहे. माझी प्रत्येक दिवाळी अशा वंचित घटकांसोबत साजरी होते. त्यासाठी मग कधी श्रीगोंद्याचा महामानव बाबा आमटे वसतिगृहातील पारध्यांच्या मुलामध्ये मिसळतो. तिथले प्रत्येक मूल कौतुकाने जवळ घेत त्याच्या हातावर दिवाळीचा फराळ ठेवतो. त्यावेळी त्या बालमुखातून जणू मला पांडुरंग दिसतो. तिथल्या वसतिगृहातील खांबाला धरून मी उभा राहून त्या मुलांशी गप्पा मारताना नकळत पंढरपूर मंदिरातील गरुडखांबाचा भास होतो. तर कधी इंदापूरला गेल्यावर तिथल्या श्रावणबाळ आश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना मिठी मारताना साक्षात जिवाशिवाची भेट झाल्याचा आनंद होतो. ज्या शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केल्या त्यांच्यापैकी काहींच्या अनाथ मुलांना सांभाळणारे अहमदनगर जवळच्या केडगाव येथे ‘सावली’ वसतिगृह आहे. तिथेही माझी दिवाळी अशीच मस्त साजरी होते.
जसे प्रत्यक्ष वारीतल्या वारकऱ्यांची सेवा करणारे, त्यांच्या चपला दुरुस्त करून देणारे, पाय दाबून देणारे इतर अनेक असतात जे त्या कामाचे एक तर पैसे घेत नाहीत किंवा अतिशय किरकोळ किंमत घेतात. याचे कारण त्यांच्या मते त्यांना स्वतःला जरी वारीला जाता येत नसले तरी किमान जे जात आहेत त्यांची सेवा केली तरी ती पांडुरंगापर्यंत पोहोचते, ही त्यामागची श्रद्धा असते. अगदी तसाच अनुभव मलाही आला. लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या ज्या-ज्या घटकांना आम्ही रेशन पुरवठा सुरू केला त्या-त्या वेळी ज्यांच्याकडून आम्ही धान्य घ्यायचो ते दुकानदार अगदी कमी किमतीत ते आम्हाला द्यायचे. हे धान्य वाहून नेण्यासाठी आम्ही जो टेम्पोवाला ठरवला होता तर त्यानेही ‘फक्त डिझेल भरून द्या, बाकी भाडे नको’ असे म्हणाला. ज्यांचे स्वतःचेच जगण्याचे वांदे झालेले तेही जेव्हा असे मदतीसाठी पुढे येतात. तेव्हा मी निरुत्तर होतो. सेवाभावातला पांडुरंग मला असा ठायी ठायी अगदी सदेह रूपात पाहायला मिळतो.
आता मला सांगा, अशी वारी तुम्हीदेखील घरोघरी करू शकता ना? त्यातून तितकाच परम आनंद मिळणार आहे. आणि संत गाडगेबाबांनी तरी वेगळं काय सांगितलं? ‘माणसात देव पाहा, त्याची सेवा करा, तीच खरी देवपूजा आहे.’ विशेष म्हणजे अशा सामाजिक वारीसाठी कधी काही अडले तर जसे जनाबाईंच्या मदतीला पांडुरंग धावून आला, तसा तो इतर कुठल्या रूपातून तुमच्याही मदतीला येतोच येतो. अनेक निमित्ते जणू पांडुरंगच समोर आणून ठेवतो असे मला वाटते आणि कमरेवर हात ठेवून जणू तो विचारतो की, ‘न मागता तुला सगळं मी दिलं आहे. आता तू काय करतो ते मला पाहायचं आहे.’
पांडुरंगाच्या त्या आत्मिक आवाहनाला सार्थ ठरवण्यासाठी मग जणू दहा हत्तीचे बळ अंगी येते. शिवाय या कामात प्रसंगी आपण अडचणीत येऊ शकतो, हा विचारही मनात येत नाही कारण त्यावेळी मनाशी एक विश्वास असतो की, मी जर लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जातोय तर त्यावेळी एक तर मला काही अडचण येणार नाही आणि आलीच तर देव ते पाहून घेईल. हे सगळे मी जे स्वतः अनुभवले तेच इथे सांगितले. याचे कारण म्हणजे उगीच पुस्तकी भाषा व उदाहरणे देत बसण्यापेक्षा जे स्वतः अनुभवले तेच मांडणे जास्त श्रेयस्कर!
आपण जिथे कुठे असू, तिथूनही बसल्या जागी वारी करता येते. अगदी तुमच्या घरी कामाला येणाऱ्या बाई असतील किंवा सोसायटीचा वॉचमन असेल, दूधवाला असेल, भाजीवाली असेल अशा सगळ्यांमध्ये तुम्हाला देव भेटू शकतो. कारण आपल्या संस्कृतीतच म्हटले आहे की आपण सगळी देवाची लेकरे असून प्रत्येकामध्ये देवाचा अंश आहे. मग त्या ‘अंशांचीच’ पूजा बांधूया. त्याच्यासाठी त्याच्यापर्यंत आपण आपल्या पायांनी जाणे हीच तर आताची वारी होईल ना? आणि मग पहा, खरोखर तुम्हाला पांडुरंगाचे दर्शन तर घडेलच, शिवाय ज्याच्यासाठी तुम्ही मदतीला धावून गेलात ती मंडळीसुद्धा जन्मभर तुमचे जणू सगेसोयरे होतील !
संतांनीही हाती घेतलेल्या कामातच देव पाहिला व भोवताली असलेल्या लोकांची सेवा करण्यात धन्यता मानली. अशी ही त्यांनीच घालून दिलेली परंपरा आपण पुढे नेऊया आणि अनोखी अशी समाजवारी करूया!
धनंजय देशपांडे
(लेखक चित्रकार, व्याख्याते व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते आहेत.)