स्टार्टअप नसणाऱ्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देणार, मंगलप्रभात लोढा यांची विधान परिषदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:47 IST2025-03-22T11:46:57+5:302025-03-22T11:47:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्याला नवे स्टार्टअप धोरण मिळणार आहे...

स्टार्टअप नसणाऱ्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देणार, मंगलप्रभात लोढा यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई : ग्रामीण भागात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप नेक्स्ट डोअर’ योजना सुरू करणार आहे. या माध्यमातून १ लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथे विशेष लक्ष दिले जाईल, असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत २६० अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये बारा बलुतेदारांसाठी ‘विश्वकर्मा भवन’ सुरू करणार असल्याची त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्याला नवे स्टार्टअप धोरण मिळणार आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे नमो रोजगार मेळावे, युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास केंद्र, महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य, विदेशात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासारखे अनेक प्रकल्प राबवता आले. त्यांचा लाडका मंत्री कोण हे ते ठरवतील. पण कौशल्य विकास विभाग त्यांचा लाडका विभाग आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.
आयटीआय सर्वात बेस्ट
आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यामुळे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्ये प्राप्त करीत आहेत विश्वकर्मा भवनमधून परंपरागत व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड मिळून रोजगार वाढतील, असे लोढा म्हणाले.
विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची संधी देणार
येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील १०० आयटीआय संस्था, आस्थापना आणि स्वयंसेवी संस्थांना प्रायोगिक तत्त्वावर दत्तक देण्यात येणार आहे.
यामुळे उद्योगांसोबत संस्थांचा थेट संबंध निर्माण होऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची संधी मिळेल. तसेच आयटीआयमधील शिक्षकांना नवीन कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी विशेष ‘ट्रेन द टीचर्स’ भवन स्थापन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.