महिला पत्रकारांना विशेष पुरस्कार द्या
By Admin | Published: April 28, 2016 02:42 AM2016-04-28T02:42:04+5:302016-04-28T02:42:04+5:30
प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये महिला पत्रकारांसाठी वेगळी श्रेणी ठेवली पाहिजे.
मुंबई: प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये महिला पत्रकारांसाठी वेगळी श्रेणी ठेवली पाहिजे. पुरुष पत्रकारांपेक्षा महिला पत्रकारांना काम करणे हे अधिक आव्हानात्मक असते. अनेक महिला पत्रकार अडचणींवर मात करून विशेष कामगिरी बजावत असतात. त्यांचे आपण कौतुक केले पाहिजे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील पत्रकारांसाठी एक वेगळी श्रेणी पुरस्कारात निर्माण करायला हवी, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
नरिमन पॉर्इंट येथील ‘एनसीपीए’ येथे प्रेस क्लब आयोजित ‘रेड इंक’ पुरस्कार सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उर्जामंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पुरस्कारविजेत्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा राज्यपाल बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार टी.एन.निनान यांना रेड इंक जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांना ‘जर्नलिस्ट आॅफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ््यात ‘हू शॉट द मेसेंजर’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात सिद्धार्थ वरदराजन, मिनाझ मर्चंट, रवीकुमार आणि सुचेता दलाल हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पत्रकारितेचे स्वरुप गेल्या काही काळात बदले आहे. प्रत्येकवेळी पत्रकाराने निष्पक्ष असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष वार्तांकन आता कमी झाले आहे. वृत्तवाहिन्यांचे निवेदक सुपरस्टार झाले आहेत. टिष्ट्वटरसारख्या माध्यमातून आता पत्रकारही विरोध करायला लागले आहेत, याविषयी पत्रकारांनी खंत व्यक्त केली.
पत्रकारांच्या केल्या जाणाऱ्या बदनामीविषयी बोलताना, बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत अधिक वाढले असल्याचे मत रवीशकुमार यांनी मांडले. ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांच्या म्हणण्यानुसार बदनामीच्या खटल्याच्या माध्यमातून पत्रकारांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला संपणवण्यासाठी तुमचे हात-पाय मोडण्याची गरज उरलेली नाही. (प्रतिनिधी)