राज्यभरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम राबवा
By admin | Published: April 13, 2017 01:33 AM2017-04-13T01:33:30+5:302017-04-13T01:33:30+5:30
महामार्गावरील दारूच्या दुकानांवरील निर्बंधाबाबत उलटसुलट चर्चा रंगलेली असताना सुरक्षित वाहतुकीसाठी राज्यभरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश
- जमीर काझी, मुंबई
महामार्गावरील दारूच्या दुकानांवरील निर्बंधाबाबत उलटसुलट चर्चा रंगलेली असताना सुरक्षित वाहतुकीसाठी राज्यभरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळतानाच मद्यपी वाहनचालकांवर केसेस करण्याच्या सूचना सर्व घटकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
१ एप्रिलपासून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. आज अखेर रोज सरासरी हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. महिन्याअखेरीस त्याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रस्त्यावरील अपघातांपैकी बहुतांश अपघात हे दारू पिऊन गाडी चालविण्याने होत आहेत, हे तपासणी अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयाने सरकारच्या मालकीच्या असलेल्या महामार्गांवर ५०० मीटरच्या अंतरावर दारूच्या दुकानांना बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जात असतानाच शासन व लोकप्रतिनिधींनी या व्यवसायातून मिळणारा महसूल लक्षात घेऊन पळवाट म्हणून ‘हायवे’चा परिसर स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सुपुर्द केला जात आहे. त्याबाबत चर्चा सुरू असताना पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षकांना अपघाताच्या प्रमाणावर प्रतिबंध घालण्यासाठी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ मोहीम सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी त्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार पोलिसांनी दैनंदिन काम सांभाळून दिवसभरात विविध टप्प्यांत ही कार्यवाही करून अहवाल मुख्यालयात पाठवायचा आहे. महत्त्वाचे सण, उत्सव किंवा स्थानिक कार्यक्रम असल्यास त्याव्यतिरिक्त अन्य दिवशीदेखील मोहीम कायम ठेवावी, अशा सूचना आहेत. या मोहिमेसाठी स्थानिक परिस्थिती, अन्य बंदोबस्ताचा विचार करूनच निर्णय घटकप्रमुखांनी घ्यायचा आहे. कारवाईमुळे तपासासह अन्य कामात खंड न पडण्याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.
प्रतिसादानंतर पुढील निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईचा काहीही संबंध नाही. सुरक्षित वाहतुकीसाठी ही मोहीम राबविली जात असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार त्याबाबत महिन्याभरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
- सतीश माथूर, पोलीस महासंचालक