मुंबईत वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीसाठी विशेष मोहीम
By admin | Published: April 30, 2016 04:51 AM2016-04-30T04:51:31+5:302016-04-30T04:51:31+5:30
दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातात अनेकदा हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते.
मुंबई : दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातात अनेकदा हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते. आता पुन्हा एकदा ३0 एप्रिलपासून याबाबत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम घेण्यात येत आहे.
कोर्टाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने दुचाकीस्वारांसाठी जानेवारी महिन्यापासून हेल्मेटसक्ती केली असून, त्यानुसार मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईही करण्यात आली. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात शाळा, महाविद्यालयांच्या सुरू असलेल्या परीक्षा पाहता पोलिसांकडून ही मोहीम थांबविण्यात आली होती. आता विशेष मोहीम घेण्यात येत आहे. यात दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत असलेल्यास हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. हेल्मेट न वापरल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिली. त्याचबरोबर चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालकासोबतच्या प्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे.