मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेष मोहीम
By Admin | Published: June 11, 2016 02:45 AM2016-06-11T02:45:29+5:302016-06-11T02:45:29+5:30
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जातात.
नवी मुंबई : पावसाळ््याच्या कालावधीत वाढणाऱ्या रोगराईवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जातात. हिवताप, डेंग्यू या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणावर घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहीम हाती घेतली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत जनजागृती मोहीमही राबविली जाणार आहे.
हिवताप, डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीपर उपक्र म जून ते सप्टेंबर या कालावधीत हाती घेण्यात येत असून त्यामध्ये हिवताप, डेंग्यू जनजागृतीपर शिबिरे, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सत्र, पन्नासहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या सोसायट्यांमध्ये तेथील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन सदनिकाधारकांची जनजागृतीपर बैठक आयोजन त्याचप्रमाणे महिला मंडळे व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. खासगी, वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. ५ जूनपासून प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यात येत आहे.
मलेरिया, डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांबाबत डासअळी व डासांची उत्पत्तीस्थाने यांची प्रात्यक्षिके, प्रदर्शन संच, गटाने व सामूहिक पध्दतीने चर्चा, हस्तपत्रके वितरण, पोस्टर्स - बॅनर्सव्दारे प्रचार करण्यात येत आहे. नागरिकांना घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी आरोग्य शिक्षण देऊन हिवताप, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांपासून संरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात येत आहे.
गप्पी मासे हे डासांच्या अळ्या खातात म्हणून नागरिकांना गप्पी माशांची आवश्यकता असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत नागरिक गप्पी मासे प्राप्त करून घेऊ शकतात. घरोघरी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तसेच महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे व रु ग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तापाच्या रु ग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते. नागरिकांनी आपले घर, कार्यालय परिसरात पाणी साचू देवू नये, तसेच हिवताप, डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव दिसल्यास व डासांचा प्रादुर्भाव दिसल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शहरातील ३.७५ लाखांहून अधिक घरांमध्ये वरची टाकी, खालची टाकी, लॉफ्ट टँक, ड्रम, टायर्स, कुंड्या अशा संभाव्य डास उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात येऊन आढळलेली डास उत्पत्ती स्थाने नष्ट, उपचारीत करण्यात आलेली आहेत. खासगी व नवी मुंबई महानगरपालिकेची रु ग्णालये, बांधकाम ठिकाणे, गॅरेजेस अशा ठिकाणी डास उत्पत्ती नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली असून त्यादृष्टीने प्रतिबंधक आरोग्य शिक्षण देण्यात आलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा तसेच खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डासनाशक फवारणी करण्यात आलेली आहे.