प्रकल्पबाधितांच्या मुलांच्या रोजगार नावनोंदणीसाठी विशेष कक्ष

By admin | Published: January 9, 2015 12:51 AM2015-01-09T00:51:13+5:302015-01-09T00:51:13+5:30

मिहानमधील विविध उद्योगांमध्ये प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एक विशेष कक्ष सुरू करण्यात येणार असून त्याच माध्यमातून मिहानमध्ये कुशल आणि अकुशल

Special cell for employment enrollment of children of project-affected children | प्रकल्पबाधितांच्या मुलांच्या रोजगार नावनोंदणीसाठी विशेष कक्ष

प्रकल्पबाधितांच्या मुलांच्या रोजगार नावनोंदणीसाठी विशेष कक्ष

Next

पालकमंत्र्यांची माहिती : विविध प्रश्नांचा आढावा
नागपूर : मिहानमधील विविध उद्योगांमध्ये प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एक विशेष कक्ष सुरू करण्यात येणार असून त्याच माध्यमातून मिहानमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
गुरुरवारी रविभवन सभागृहात पालकमंत्र्यांनी मिहान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बहादुरा येथील शिवम फूड कॉर्पोरेशन आणि मौदा येथील साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बैठकीच्या कामकाजाची माहिती दिली.
मिहानच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी येत्या सात दिवसात मिहानमध्ये एक विशेष कक्ष सुरू केला जाईल. प्रकल्पबाधितांच्या मुलाची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तेथे नोंदणी करण्यात येईल व मिहानमधील उद्योजकांना त्यांच्या गरजेनुसार या कक्षाच्या माध्यमातून कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पुरविले जाईल, असे बावनकुळे म्हणाले. मिहानमध्ये १९३ सुरक्षा रक्षकांची भरती अशाच प्रकारे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, कीर्तीकुमार भागडिया, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मिहानचे अधिकारी आणि कामगार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
शिवम फूड कार्पोरेशन
बहादुरा येथील शिवम फूड कार्पोरेशन कंपनीत अतिरिक्त ठरलेल्या २४० मजुरांचे वेतन आणि सेवांचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या २४० मजुरांना कंपनीत १५ दिवसांचे काम देण्यात आले आहे. क्रीम बिस्कीट उत्पादनाचे काम बंद झाल्याने मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मालक आणि कामगार प्रतिनिधी यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.(प्रतिनिधी)
महामार्ग बांधकामाचा अतिरिक्त आराखडा तयार
पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील कामाचाही आढावा घेतला. नागपूर-भंडारा, नागपूर -सावनेर आणि नागपूर-वळण मार्ग (बायपास) बांधकामाचा अतिरिक्त आराखडा (चेंज आॅफ स्कोप) तयार करण्यात आला असून तो आजच दिल्लीला पाठविण्यात येणार आहे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना आराखडा मंजूर करण्याबाबत विनंती करू, असे बावनकुळे म्हणाले. महामार्ग सातसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागेवर ३१ जानेवारीपर्यंत काम सुरू करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. नागपूर बायपासमधील कापसी खुर्द,कापसी बु. आणि महामार्ग ६९ वरील झिंगाबाई टाकळी-मानकापूर-माळेगाव येथील जमीन अधिग्रहित करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, नागपूर-भंडारा मार्गावरील अतिक्रमण काढावे आणि मानकापूर रेल्वे क्रॉसिंगजवळ भुयारी मार्ग बांधण्यासाठी प्रस्ताव तातडीने तयार करावे,असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मौदा साखर कारखाना
मौदा येथील श्रीराम साखर कारखान्यातील २९२ मजुरांना कारखान्यातर्फे देय असलेले ३ कोटी ९ लाख रुपये वाटप करण्याच्या संदर्भात तीन दिवसांत तोडगा काढावा, असे निर्देश यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले. सध्या बंद अवस्थेत असलेला कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीने खरेदी केला आहे. कंपनी-कामगार आणि ऊस उत्पादकांमध्ये झालेल्या करारानुसार जुन्या कामगारांच्या वेतनाची जबाबदारी नवीन व्यवस्थापनाने घेतली आहे. बैठकीला साखर सहसंचालक राजेंद्र दाभेराव उपस्थित होते.
दर आठवड्याला आढावा
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विकास कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांची परिषद ३१ ला
३१ जानेवारीला मिहानमधील गुंतवणूकदारांची नागपूरमध्ये परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहतील. मिहानमधील विजेचा प्रश्न सुटला असल्याने ज्यांनी मिहानमध्ये भूखंड घेतला आहे त्यांनी तीन महिन्यात प्रकल्प सुरू करावा, अशी विनंती करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Special cell for employment enrollment of children of project-affected children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.