विशेष समिती बैठकांना गैरहजेरी भोवणार
By admin | Published: July 23, 2016 03:56 AM2016-07-23T03:56:27+5:302016-07-23T03:56:27+5:30
महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींना एसी गाडीतून फिरणे आणि भ्रमणध्वनीचे बिल घेणे इतकेच अधिकार आहेत
ठाणे : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींना एसी गाडीतून फिरणे आणि भ्रमणध्वनीचे बिल घेणे इतकेच अधिकार आहेत का, ते कोणताही निर्णय घेऊ शकत नसतील तर मग त्यांचा फायदा काय, असा संतप्त सवाल सदस्यांनी बुधवारच्या महासभेत केला. विशेष समित्यांच्या बैठकीचे महत्त्व अधिकाऱ्यांना वाटत नसल्याने अनेक वेळा अधिकारीवर्ग या बैठकांना गैरहजर असतो. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पीठासीन अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी दिले.
ठाणे महापालिकेच्या विशेष समित्या या केवळ नावापुरत्या आहेत. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे काहीच अधिकार नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित केला. त्यातही, या विशेष समित्यांच्या बैठकांचे महत्त्व अधिकारीवर्गाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक वेळा या समित्यांच्या बैठकीला अधिकारीवर्ग गैरहजर राहतात. त्यामुळे या समित्यांचा फायदा काय, असा सवाल त्यांनी केला. सदस्यांच्या तीव्र भावनांची दखल घेत अखेर बैठकांना गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश पीठासीन अधिकारी साप्ते यांनी दिले.
>ठाणे महापालिकेचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी मे महिन्याच्या अखेरीस स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मात्र, त्यांच्या विभागीय चौकशीची प्रकरणे सुरू असताना त्यांना अशा प्रकारे स्वेच्छानिवृत्ती घेऊन इतरत्र नोकरी करता येऊ शकते का, असा प्रश्न महासभेत विचारण्यात आला. तसेच त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीनंतर दिले जाणारे त्यांचे सर्व फायदे रोखून धरावे, अशी मागणीही सदस्यांनी केली.