नाट्य संमेलनाध्यक्षांना विशेष अधिकार!, दीड लाखांचा निधी; परिषदेने केली घटनादुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:02 AM2018-01-20T05:02:48+5:302018-01-20T05:02:48+5:30
यंदाच्या नाट्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेने घटनादुरूस्ती केली असून त्याद्वारे नाट्य संमेलनाध्यक्षांना विशेष अधिकार दिले आहेत.
राज चिंचणकर
मुंबई : यंदाच्या नाट्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेने घटनादुरूस्ती केली असून त्याद्वारे नाट्य संमेलनाध्यक्षांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यांना दीड लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यासह, नाट्य परिषदेच्या रचनेमध्ये ‘नाट्य संमेलनाध्यक्ष’ हे पद सर्वोच्च मानाचे ठरविण्यात आले आहे.
या बदलाचा सकारात्मक परिणाम नाट्य संमेलनाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर होणार आहे. नाट्य संमेलनानंतरच्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या सभेत, संमेलनाध्यक्ष म्हणून ते वर्षभर करू इच्छिणाºया उपक्रमांचा आराखडा सादर करू शकणार आहेत. या कार्यक्रमांसाठी आर्थिक नियोजन करून, ते उपक्रम शाखेमार्फत कार्यान्वित करू शकणार आहेत. याबाबत नाट्य संमेलनाध्यक्षांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या कार्यक्रमांसाठी नाट्य संमेलनाध्यक्षांना वार्षिक दीड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे परिषदेला बंधनकारक असल्याची तरतूद घटनेत करण्यात आली आहे. कार्यक्रमांचे हिशेब नाट्य परिषदेला सादर केल्यावर, हा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.