विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान
By admin | Published: November 4, 2016 05:43 AM2016-11-04T05:43:20+5:302016-11-04T05:43:20+5:30
किनान - रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींनी विशेष महिला न्यायालयाने ठोठावलेल्या आजन्म कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले
मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनान - रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींनी विशेष महिला न्यायालयाने ठोठावलेल्या आजन्म कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी या चारही जणांना छेडछाड, कट आणि हत्या या आरोपांखाली दोषी ठरवत ५ मे रोजी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली, तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
या चौघांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या अपिलावरील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पाच वर्षांपूर्वी, २० आॅक्टोबर २०११ मध्ये किनान (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील एका रेस्टॉरंटमधून त्यांच्या दोन मैत्रिणींसह बाहेर पडले. त्या वेळी काही रोडरोमियोंनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींची छेड काढण्यात येत आहे, हे बघून किनान व रुबेन वैतागले. त्यांनी त्या तरुणांना रोखले. बाचाबाची झाल्यावर ते तरुण निघून गेले. मात्र, थोड्या वेळाने आणखी काही मित्र घेऊन परत आले. चार जणांनी किनान, रुबेनला मारहाण करून त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला. किनानचा मृत्यू त्याच रात्री झाला, तर रुबेनचा मृत्यू ३१ आॅक्टोबर रोजी झाला. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चारही आरोपींचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचेही पुढे पोलीस तपासात उघडकीस आले. (प्रतिनिधी)