विशेष मुलाखत : ’वक्तृत्वा’ मुळे विचारांचा वसंत : डॉ. रामचंद्र देखणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:17 PM2019-07-15T13:17:40+5:302019-07-15T13:22:57+5:30

ज्यांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नांदत असल्याचा भास श्रोत्यांना होई, असे व्यक्तित्त्व म्हणजे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा कोणाही वक्त्यासाठी आनंदाचा क्षण.

Special Interview: 'Speech' due to the spring of thoughts: Dr. Ramachandra dekhane | विशेष मुलाखत : ’वक्तृत्वा’ मुळे विचारांचा वसंत : डॉ. रामचंद्र देखणे

विशेष मुलाखत : ’वक्तृत्वा’ मुळे विचारांचा वसंत : डॉ. रामचंद्र देखणे

Next

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉ. रामचंद्र देखणे यांना उद्या (१५ जुलै) प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त डॉ. देखणे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.

- नम्रता फडणीस-
* प्राचार्यांच्या नावाने सन्मान होणार, या कल्पनेने काय भावना निर्माण झाली ?
- हा पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या एका शब्दप्रभूच्या नावाने मिळत आहे, याचा आनंद आहे. तीन दशके मी व्याख्यान किंवा निरूपणातून जे मांडत आहे. त्याची कृतार्थता झाल्यासारखं वाटत आहे. वारीच्या वाटेवर असतानाच ही पुरस्काराची वार्ता कळाली. दरवर्षी आमची दिंडी फलटणी मुक्कामी असते. ज्या महाविद्यालयाचे शिवाजीराव भोसले हे प्राचार्य होते. त्याच महाविद्यालयाच्या प्रांगणात आमची दिंडी उतरते. गेली अनेक वर्षे प्राचार्य ज्या केबिनमध्ये बसायचे त्याच्या बाहेरचं आम्ही आमची वारी सेवा समर्पित करतो. त्याचा काही अनुबंध तर या पुरस्काराशी जोडला गेला नसेल ना? असे भाव मनात आले. सात्विक आनंदाची अनुभूती मिळाली.

* प्राचार्यांशी ॠणानुबंध कसे जुळले?
- महाविद्यालयात असताना त्यांची अनेक व्याख्याने जवळून अनुभवली. त्यांचे विचार ऐकता ऐकता माझे कान घडले. वक्तृत्वाची ओळख आणि संहिता प्राचार्यांच्या व्याख्यानातून करून घेत होतो. महाराष्ट्रामध्ये व्याख्यातांची खूप मोठी परंपरा  आहे. त्यामध्ये बाळशास्त्री हरदास, नरहर कुरूंदकर, राम शेवाळकर, बाळासाहेब भारदे, आचार्य अत्रे, पु.ल देशपांडे आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले या मंडळींची नावं प्रामुख्यानं घ्यावी लागतील. मला पुलं, अत्रे, शेवाळकर आणि प्रामुख्याने प्राचार्य ऐकायला मिळाले. एका शाहिराने  ’जिव्हेवरती बस माझ्या’’ असं आवाहन सरस्वतीला केलं होतं. सरस्वती जिव्हेवर कशी बसते नव्हे नाचते हे अनुभवायचे असेल तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान ऐकलं पाहिजे. आमच्या पिढीचे कान आणि मन हे प्राचार्यांच्या व्याख्यानानं समृद्ध आणि संस्कारित झालं आहे.

*तुम्ही वक्तृत्व कलेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
- वक्तृत्व म्हणजे वक्ता आणि श्रोत्यांमधील शब्दसंवादाचा अद्वय आनंद आहे. वक्ता आणि श्रोता हे द्वैत आहे, पण वक्ता जे बोलतो तेचं श्रोता ऐकत असतो हे अद्वैत आहे. तत्त्वज्ञानातच केवळ द्वैत आणि अद्वैत संकल्पना असते असं नाही. द्वैत आणि अद्वैत हे अद्वैताच्या पलीकडं गेललं असतं. असं काहीसं बोलणं प्राचार्यांच्या मुखातून बाहेरं पडायचं. ज्ञानदेवांनी वक्तृत्वाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. ‘श्रवणसुखाची मांडवी, विश्व भोगी माधवी, कैसी साफिलनवी बरवी वाचावल्ली’! म्हणजे वक्तृत्वाने श्रवणसुखाची मांडवी उभी राहाते आणि रसिकांच्या अंर्तमनाम्ध्ये विचारतत्वाची माधवी फुलते. माधवी म्हणजे वसंत. तो शब्दवसंत फुलविण्याचं सामर्थ्य वक्तृत्व आणि वक्त्यामध्ये आहे.

*तुमच्यात वक्तृत्व शैली कशी विकसित झाली?
- वडिलांच्या बरोबरीनं अनेक कीर्तनकार ऐकले. लोकनाट्यामध्ये बतावणी असते. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे स्वत:च्या प्रतिभेनं ते काही शब्दसंवाद करीत असतात. या सवार्तून कान घडत गेले. एकीकडे ऐकणं आणि वाचन यातून माझ वक्तृत्व उभं राहिलं.

* महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेविषयी काही सांगू शकाल ? त्याची अंग कोणती?
-महाराष्ट्रात संकीर्तनाची खूप सुंदर परंपरा आहे. त्यामुळं ग्रंथ विषय सामान्यापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचला. एकीकडं निर्मिती ही प्रबंध रचनेतून झाली तर अभंग व गाथा रचनेतूनं त्याची अभिव्यक्ती व्हायला लागली. ही निर्मिती आणि अभिव्यक्ती या गोष्टी संकीर्तनाने घडविल्या. त्यामुळं विचारांचं समीक्षण झालं. संवाद झाला. कीर्तन हा श्रोत्यांशी घडणारा संवाद असतो. कीर्तनाची तीन अंग मानली जातात. सिद्धांत, दृष्टांत आणि प्रमाण याचं एकत्रिकीकरणं म्हणजे कीर्तन आहे

*वाडमय आणि तत्वज्ञानाच्या अनुषंगाने पण कीर्तनाचे विभिन्न प्रकार मांडले जातात, ते कोणते?
- गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि  नाम संकीर्तन असे तीन वाडमय आणि तत्वज्ञानाच्या अनुषंगाने कीर्तनाचे तीन प्रकार मानले गेलेले आहेत. भगवंताचं तात्विक चिंतन गुण संकीर्तन ( निरूपण) मध्ये होते. लीला संकीर्तनमध्ये चरित्रगायन, कथा किंवा लीला सांगितली जाते. यातून राष्ट्रीय कीर्तन पुढं आलं मग सर्व श्रोत्यांना सहभागी करून घेण्यासाठी नाम संकीर्तन सांगितलं जातं. कीर्तन ही भक्ती, कला आणि श्रवणही आहे. कलेच्या अंगाने विविध अविष्कार आणले तर ते अधिक रसाळ होईल म्हणून विविध पद्धतीने कीर्तन परंपरा आली. त्यात वारकरी संप्रदायाचं कीर्तन, नारदीय कीर्तन, हरिदासी, नामदासी आणि राष्ट्रीय कीर्तन आले. एक अजून एक प्रकार आहे संत गाडगेबाबा कीर्तन. जे संवादात्मक कीर्तन आहे.

*कीर्तनाबरोबरच लोककलांवर आधारित ‘बहुरूपी भारूड’ सारखे कार्यक्रम तुम्ही करता? आज लोककलांचे अस्तित्व कितपत टिकून आहे असं वाटतं?
- कीर्तन पूर्वी मंदिरात होतं. आता ते रंगमंदिरात आलं. लोककलांमधल्या ज्या लोकभूमिका होत्या उदा: वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी त्यातील अनेक भूमिका आज काळाच्या ओघात लोक पावत चालल्या आहेत. पण लोककलांमधले काही भारूड, गोंधळ, जागरण या लोकाचाराचे प्रकार आहेत ते टिकून आहेत. लोककलांचा लोकाश्रय संपला असला तरी प्रायोगिक आणि परंपरा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून लोककला राहतील.

*पण त्यासाठी कोणते प्रयत्न व्हायला पाहिजेत?
-लोककलांची संहिता तयार झाली पाहिजे. तसे झाले नाही तर ही कला मौखिकचं राहिल. आज लोकनाट्याची मूळ संहिता ही कीर्तनाच्या आख्यानात किंवा वगात असू शकते. यासाठी लोककलांची शब्दबद्ध संहिता निर्माण होणं आवश्यक आहे. अभिजात संगीत कलेसाठी शासन स्तरावर खूप मान्यता मिळते तसंच लोककलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे. लोककलेसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम निर्माण झाला पाहिजे.

Web Title: Special Interview: 'Speech' due to the spring of thoughts: Dr. Ramachandra dekhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे