विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:59 IST2025-03-21T09:58:37+5:302025-03-21T09:59:37+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणतात : स्पर्धा जगाशी, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ हवे; किती तास काम यावर आम्ही ठेवत नाही नियंत्रण; कामाचे लक्ष्य पूर्ण केले की आम्ही देतो निर्धारित केलेला बोनस...!

विशेष मुलाखत : हे दशक भारताचे, आता चूक व्हायला नको; तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा
Lokmat Maharashtrian Of The Year Awards : उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती हे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी जे वित्तसाह्य लागते ते देण्याच्या क्षेत्रात आजच्या घडीला देशातील अग्रेसर असलेल्या बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांची मुलाखत हे यावेळचे वैशिष्ट्य होते. लोकमत समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी संजीव बजाज यांच्या व्यवसायाची सुरुवात, त्यांची कार्यपद्धती, व्यवसायातील बारकावे अशा विविध मुद्यांवर त्यांना बोलते केले.
बजाज - अलायन्झ या कंपनीतील अलायन्झची हिस्सेदारी तुम्ही २४ हजार कोटी रुपयांना विकत घेतली. विमा आणि बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील हा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. यामागे तुमचा विचार काय होता? यामुळे विमा उद्योगाचा चेहरा कसा बदलणार आहे?
उत्तर : २००१मध्ये ही कंपनी अलायन्झसोबत सुरू झाली. त्यात आमची हिस्सेदारी ७४ टक्के, तर त्यांची २६ टक्के होती. दोन दशकांहून अधिक काळामध्ये आम्ही विमा क्षेत्रातील एक उत्तम कंपनी निर्माण केली. इतर क्षेत्रांप्रमाणेच विमा उद्योगाचाही आता मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. दोन्ही कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर विस्तार करायचा आहे. त्यामुळे एका कंपनीत दोन कॅप्टन एकत्र काम करू शकत नाहीत, या विचाराने आम्ही सामोपचाराने वेगळे होण्याचा
निर्णय घेतला.
तुम्ही १० लाख कोटी रुपयांच्या उलाढालीच्या व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहात. मात्र, यासाठी मोठे परिश्रम लागले असतील. सुरुवातीचे दिवस कसे होते ?
उत्तर : आमची टीम उत्तम आहे. पण, एक आवर्जून सांगावेसे वाटते की, जर आम्ही हा व्यवसाय भारतात करत नसतो तर परिस्थिती कठीण असती. भारतामध्ये व्यवसाय करत आहोत म्हणून हे यश आहे. २००७मध्ये मी बजाज ऑटोमधून बाहेर पडलो आणि वित्तीय व्यवसायाची सुरुवात केली. आम्हाला केवळ एक उद्दिष्ट गाठायचे नाही तर हा एक प्रवास आहे तो अधिक सक्षमपणे करायचा आहे. जागतिक पातळीवरील एक उत्तम भारतीय कंपनी ही ओळख निर्माण करायची आहे. फक्त मेक इन इंडिया नाही तर बाय इंडिया आणि फॉर इंडिया या पद्धतीने काम करायचे आहे.
जेव्हा तुम्ही बजाज फिनसर्व्ह सुरू केली, त्यावेळी तुम्ही एका अत्यंत स्थिर व्यवसायात होतात. त्यात अधिक विस्तार करण्याऐवजी तुम्ही अगदी नव्या उद्योगाची नव्याने सुरुवात केली. त्यामागे काय विचार होता ?
उत्तर : मी १० वर्षे बजाज ऑटोमध्ये काम केले. माझा भाऊ राजीव आता ती कंपनी अतिशय उत्तम सांभाळत आहे. जे उद्योजक नव्याने स्टार्टअप सुरू करतात, त्यात त्यांचे भांडवल, बचत, करियर असे सर्व काही पणाला लागते. त्या तुलनेत मी भाग्यवान आहे. कारण मला एका उद्योजक घराण्याचे पाठबळ होते. बजाज फिनसर्व्ह सुरू केले, त्यावेळी बजाज ऑटोपेक्षा माझी कंपनी अर्थातच कित्येक पटीने लहान होती. मात्र, उद्योजक होण्यासाठी आवश्यक झपाटलेपण मी आणि माझ्या टीममध्ये होते. अनेकवेळा अपयश येईल हेही माहिती होते. पण, चिकाटीने आम्ही काम करत आज इथवर पोहोचलो आहोत.
बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात अनेक नव्या कंपन्या येत आहेत. या नव्या कंपन्यांच्या तुलनेत तुम्ही स्पर्धा कशी कराल आणि पुढे कसा विस्तार होईल?
उत्तर : अभिनिवेशाने सांगत नाही. पण, आम्ही त्यांच्याशी नाही तर ते आमच्याशी स्पर्धा करत आहेत. जागतिक कंपन्यांनी जे मापदंड तयार केले आहेत, ते गाठण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ग्राहकाची गरज ओळखून त्यादृष्टीने अभिनव कार्यपद्धती विकसित करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. उदाहरण सांगायचे तर २००८ यावर्षी लोकांकडे फारशी क्रेडिट कार्ड नव्हती. त्यावेळी जर एखाद्याला टीव्ही घ्यायचा असेल तर तो रोखीने किंवा कर्ज काढून घेतला जायचा. पण, त्या कर्जासाठी तीन दिवसांची प्रक्रिया असायची. मग आम्ही विचार करत क्रेडिट स्कोअर टेक्नॉलॉजी विकसित केली आणि त्यामुळे तीन मिनिटांत कर्जाची मंजुरी मिळू लागली. आता तर ३० सेकंदात कर्ज मंजुरी होते.
सध्या प्रत्येक आठवड्यात किती तास काम करायचे अशी एक चर्चा आहे. यावर तुमचे काय मत आहे ?
उत्तर : किती तास काम करायचे यावर आम्ही नियंत्रण ठेवत नाही. पण ज्या व्यक्तीचे जे काम आहे त्याचे जे नियम किंवा कार्यपद्धती आहे त्यानुसार त्याला ते काम करावे लागते. आम्ही कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचे लक्ष्य देतो, ते पूर्ण केले की त्यानुसार निर्धारित बोनस दिला जातो. कोरोनानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची अनुमती देण्यात आली, त्यावेळी घरातून किंवा झूमद्वारे काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन, सोबत बसून काम करण्यावर आम्ही भर दिला.
२०३० मध्ये भारतासाठी सर्वात मोठी संधी काय आहे असे वाटते ?
उत्तर : हे दशक भारताचे आहे. आता चूक व्हायला नको. आपल्याकडे असलेली क्षमता, तरुणांची संख्या आणि विकासासाठी कटिबद्ध सरकारचे पाठबळ ही एक मोठी त्रिसूत्री आहे, त्यामुळे आगामी दशक हे भारतासाठी सोन्यासारखे आहे. आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. अनेक देशांना आपल्यासोबत व्यवसाय करायचा आहे. उद्योगस्नेही होण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. राज्य सरकार देखील करत आहेत. जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आवश्यक तुल्यबळ पाठबळ मिळण्याची गरज आहे आणि ते मिळतही आहे.
रॅपिड प्रश्न फायर उत्तरे
तुमच्या वडिलांखेरीज अन्य कोणाकडे आदर्श म्हणून पाहता?
उत्तर : नाही. मी फक्त वडिलांकडेच आदर्श म्हणून पाहातो आणि शिकायचे म्हणाल तर, मी प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकतच असतो.
तुम्हाला आतापर्यंत मिळालेला उत्तम आर्थिक सल्ला कोणता आहे ?
उत्तर : तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाची बचत करा.
बजाज खेरीज कोणत्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे आहेत ?
उत्तर : आमच्या कुटुंबाकडे केवळ आमच्याच कंपनीचे शेअर्स आहेत.
पालकांनी आम्हाला समाजाचा चेहरा दाखवला
उद्योगपती राहुल बजाज यांचे सुपुत्र असलेल्या संजीव बजाज आणि त्यांच्या भावंडांचे शिक्षण त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळेतच झाले.
यावर संजीव बजाज म्हणाले की, माझी आई मध्यमवर्गीय मराठी घरातली आहे तर वडिलांच्या कुटुंबाला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे.
मुलांच्या जडणघडणीच्या वयात मुले काय पाहतात, ते जास्त महत्त्वाचे आहे, असा विचार करूनच आम्हाला समाजाचा खरा चेहरा कळावा, यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांप्रमाणे आम्हालाही त्यांच्याच शाळेत शिक्षण देण्यात आले.
तुम्हाला कधी बजाज फिनसर्व्हकडून कर्ज पाहिजे का, असा फोन येतो का ?
उत्तर : ९५% फोन थर्ड पार्टीकडून येतात. आमच्याकडून केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाण केवळ २ ते ३% आहे. आमच्या वेबसाइटवर डू नॉट डिस्टर्बची लिंक आहे. तेथून हे बंद करता येऊ शकते. पण ज्या पद्धतीची आर्थिक उलाढाल आहे त्या तुलनेत त्रास देण्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. महिन्याकाठी ४०० तक्रारी येतात. त्या कमी करण्यावर भर आहे.