विशेष सरकारी वकील नेमावा

By admin | Published: April 5, 2017 01:24 AM2017-04-05T01:24:49+5:302017-04-05T01:24:49+5:30

ताथवडे येथील बालाजी महाविद्यालयात शिकणारी अश्विनी बोदकुरवार ही महाविद्यालयीन तरुणी प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाली

Special Public Prosecutor Nemava | विशेष सरकारी वकील नेमावा

विशेष सरकारी वकील नेमावा

Next

पिंपरी : ताथवडे येथील बालाजी महाविद्यालयात शिकणारी अश्विनी बोदकुरवार ही महाविद्यालयीन तरुणी प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी शिवसेनेच्या उपनेत्या व आमदार नीलम गोऱ्हे यांनी जखमी तरुणीसह तपासी अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असून, त्याबाबत विधान परिषदेत मागणी करणार असल्याचेही या वेळी नमूद केले.
आमदार गोऱ्हे यांनी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांची भेट घेत घटनेची तपशीलवार माहिती घेतली. तसेच हल्ला प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये अन्यथा साक्षीदार व तरुणीवर तो दबाव आणेल, यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली.
या वेळी पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव म्हणाले, की परिसरात ६३ शैक्षणिक संस्था असून, वाकड पोलीस ठाणे परिसरात सातत्याने संवाद व तक्रारींची दखल घेणारी यंत्रणा राबविण्यात येत आहे. तसेच सायंकाळी ६ ते १० या वेळेत पोलीस ठाण्यातील १५० जणांचा स्टाफ गस्त घालतो. तसेच प्रकाश मुत्याळ हे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना स्त्री आधार केंद्र यांच्या सहकार्याने बालाजी संस्थेत पोलीस दक्षता समित्या, पोलीस व विद्यार्थी यांच्या कार्यक्रमात आलेल्या सूचनांचाही पाठपुरावा करण्यात आला आहे. संस्थेने तक्रार आधी दिली असती, तर आम्ही लगेच कारवाई केली असते असे सांगून आता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनेनुसार १५० मुलींचे व्हॉटस अप ग्रुप करून महिला पोलिसांशी बडी कॉप योजनेत जोडल्याचे सांगितले.
यानंतर आमदार गोऱ्हे व शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आमदार संजीव बोदकुरवार व जखमी विद्यार्थिनी अश्विनी हिची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी बनण्याची इच्छा तिने व्यक्त केली.(प्रतिनिधी)

Web Title: Special Public Prosecutor Nemava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.