अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:01 AM2018-08-14T06:01:10+5:302018-08-14T06:01:32+5:30
अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई - अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी महाविद्यालयांना इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा सरंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विशेष फेरीसाठी एकूण १ लाख १५ हजार ७३० जागा उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना १३ आणि १४ आॅगस्ट रोजी या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली असून त्यांची गुणवत्ता यादी १८ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
दुसऱ्या फेरीत अल्पसंख्याक कोट्यातील जागांचा घोळ झाल्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरंडर न करता महाविद्यालय स्तरावर त्याच जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक नव्वदीपार विद्यार्थीही तिसºया आणि चौथ्या यादीबाहेर राहिले. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय न मिळालेले ८० ते ९० टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही प्रवेशाविनाच आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे.
केंद्रीय प्रवेशाच्या ९३,३२१ जागा
विशेष फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या ९३ हजार ३२१ जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयांनी आपल्या तिन्ही कोट्यांतील जागा या वेळी समाप्त केल्याने या जागांची संख्या वाढली आहे. यामध्ये इनहाउसच्या ६०७२, अल्पसंख्याकच्या १० हजार ६६३, व्यवस्थापनाच्या ५,६७४ जागांची भर पडली आहे. यामुळे विशेष फेरीसाठी उपलब्ध जागांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे.