विशेष विद्यार्थ्यांचे बारावीत घवघवीत यश
By admin | Published: May 31, 2017 04:12 AM2017-05-31T04:12:43+5:302017-05-31T05:02:17+5:30
शारीरिक मर्यादांवर मात करून मुंबई विभागातील काही विद्यार्थ्यांनी बारावीत यश संपादन केले आहे. सातत्य आणि एकाग्रतेने
मुंबई : शारीरिक मर्यादांवर मात करून मुंबई विभागातील काही विद्यार्थ्यांनी बारावीत यश संपादन केले आहे. सातत्य आणि एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश आपलेच असते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.
सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकणाऱ्या निकिता सोनवणे या अंध विद्यार्थिनीने बारावीमध्ये ८० टक्के गुण संपादित केले. निकिताची आर्थिक परिस्थिती बेताची असून, तिची आई काबाडकष्ट करून तिला शिकवत आहे. मुंबईतील लालबाग येथील श्रीकृष्ण इमारतीमध्ये निकिता तिच्या आईसोबत भाड्याच्या घरात राहते. ती दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत होती. तसेच, अभ्यासात मैत्रिणींची मदत झाल्याचे निकिता सांगते. सध्या तरी कला शाखेत पदवी घेण्याचा मानस असून, कला क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची प्रतिक्रिया निकिताने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
के.जे. सोमय्या महाविद्यालयात निधी देढिया ही कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने बारावीत ७२ टक्के गुण मिळवले आहेत. जन्मत: निधीला अलबिनिझम हा आजार आहे. ती फक्त २५ टक्केच पाहू शकते. त्यामुळे बारावीचा अभ्यास करताना भिंगाचा वापर करायची. त्याच्या साहाय्याने तिने काही प्रमाणात स्वअध्ययन केले होते. निधीला संगीतात रस आहे. पुढे तिला संगीतात शिक्षण घ्यायचे असून, बीएडदेखील करायचे आहे.
तन्मय मिरगल हा अंध विद्यार्थी आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत ७७.३८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्राध्यापकांच्या मदतीने आणि घरच्यांच्या मदतीने तन्मयने अभ्यास केला होता. राज्यशास्त्र या विषयात तन्मयला ८५, तर हिंदीमध्ये ८३ गुण मिळाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती.