नागपूर, अमरावती, पुणेसाठी विशेष ट्रेन
By admin | Published: May 8, 2017 04:48 AM2017-05-08T04:48:18+5:302017-05-08T04:48:18+5:30
उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गावाकडे जाण्यास लगबग सुरू आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोईसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गावाकडे जाण्यास लगबग सुरू आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने नागपूर, पुणे आणि अमरावती मार्गावर साप्ताहिक वातानुकूलित सुपर फास्ट विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ मे पासून दर शुक्रवारी पुणे ते अजनी, १३ मे पासून दर शनिवारी नागपूर ते अमृतसर आणि १० मे पासून दर बुधवारी पुणे ते अमरावती या विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुट्टीमुळे गावाकडे जाण्यासाठी आणि सुट्टीमध्ये पर्यटनासाठी प्रवाशांचा ओढा असतो. परिणामी, पुणे, नागपूर आणि अमृतसर मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत होती. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने विशेष साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, १२ मे पासून ट्रेन क्रमांक २२१२३, पुणे-अजनी सुपर फास्ट विशेष एक्स्प्रेस पुणे येथून १५.१५ वाजता अजनीसाठी रवाना होणार आहे. १६ मे पासून ट्रेन क्रमांक २२१२४, प्रत्येक मंगळवारी अजनीहून पुण्यासाठी धावणार आहे.
ट्रेन क्रमांक २२१२५ नागपूर-अमृतसर विशेष एक्स्प्रेस १३ मे पासून नागपूरहून १७.५० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी २१.०५ वाजता अमृतसर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक २२१२६, १५ मे पासून अमृतसर येथून ४.१० वाजता रवाना होईल. ट्रेन क्र. २२११७, पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस १० मे पासून दर बुधवारी पुण्याहून १५.१५ वाजता सुटून, दुसऱ्या दिवशी ३.१५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक २२११८, ११ मेपासून दर गुरुवारी अमरावतीहून १८.३५ वाजता पुण्यासाठी धावेल.
उद्घाटन विशेष
ट्रेन क्रमांक ०२१२४, अजनी-पुणे विशेष गाडी ही उद्घाटन विशेष एक्स्प्रेस म्हणून चालवण्यात येणार आहे. ही विशेष ट्रेन अजनी येथून ११.४० मिनिटांनी सुटणार असून, ती ०३.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण ८ मे पासून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.