नगरमध्ये ‘स्पेशल छब्बीस’चा पर्दाफाश
By admin | Published: October 28, 2015 02:17 AM2015-10-28T02:17:57+5:302015-10-28T02:17:57+5:30
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून चौकशीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री सावेडी भागातील गुलमोहोर रोड परिसरात अटक केली
अहमदनगर : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून चौकशीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री सावेडी भागातील गुलमोहोर रोड परिसरात अटक केली. तोतया अधिकाऱ्याने महामार्गावरील ट्रकचालकांनाही लुटल्याचे तपासात उघड झाले आहे.
नगर तालुक्यामधील काही ठिकाणी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून, दोघांकडून लूट सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना फोनवरून मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांचा गेल्या १५ दिवसांपासून तोतया सीबीआय अधिकाऱ्याचा शोधात होते.
‘स्पेशल छब्बीस’ चित्रपटाच्या धर्तीवर या तोतयांची लूट सुरू असल्याचे डॉ. त्रिपाठी यांना सांगण्यात आले होते.
सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने डॉ. त्रिपाठी यांना फोनवरून ते सीबीआय अधिकारी सावेडी भागातील गुलमोहोर रोडवर आल्याचे कळविले. त्यानुसार, पाटोळे यांनी सापळा रचून सोमवारी रात्री दहा वाजता दोघांना अटक केली. आदित्य शाम गुजर आणि सागर रामचंद्र जाधव अशी अटक केलेल्या तोतयांची नावे आहेत. यातील आदित्य गुजर हा सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत होता, तर सागर जाधव त्याचा साथीदार होता. (प्रतिनिधी)