मुंबई मराठा क्रांती मोर्चासाठी स्पेशल वॉर रुम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 01:08 PM2017-08-08T13:08:59+5:302017-08-08T15:26:43+5:30
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे
मुंबई, दि. 8 - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार, गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. वाहतूक पोलिसांनीही मोर्चासाठी कंबर कसलीय.
बुधवारी सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या गाड्यांची गर्दी पाहता नवी मुंबई रेल्वे स्थानकाच्या बाहेरील मैदानात पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर महामार्गावर वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात असणार आहेत. याशिवाय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या आंदोलकांच्या सुरक्षेसाठीही रेल्वे स्थानकांच्या आवारात पोलीस तैनात असणार आहेत.
एकच चर्चा, मराठा मोर्चा
दरम्यान, मराठा मोर्चा लक्षनीय व्हावा, म्हणून शिवाजी मंदिरात एक हजार लोकांसाठी स्पेशल वॉर रुम तयार करण्यात आली आहे. या रुममधून मोर्चा संदर्भात आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत. व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबुक इन्स्टाग्रामद्वारे सोशल मीडियावर मोर्चासंदर्भातील प्रत्येक माहिती देण्यात येईल. कोणत्या जिल्ह्यातील वाहनांची पार्किंग सोय कुठे व कशी असणार आहे? याची जबाबदारी कुणी घ्यायची? याबद्दलच्या सूचना येथून दिल्या जाणार आहेत.
#एकचचर्चामराठामोर्चा शिवाजी मंदिरातील वॉर रूममधून सोशल मीडिया टीम मोर्चाच्या नियोजनात मग्न.
दरम्यान, समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, महामोर्चा हा मूक स्वरूपाचा असून, मुंबईच्या इतिहासात तो सर्वात मोठा असेल. आतापर्यंत 57 मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या 58व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी 11 वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.
मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
चेंबूरपासून वाहतुकीला बगल
मुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.