बलात्काराने भूत उतरविणारा मांत्रिक अखेर जाणार तुरुंगात
By admin | Published: December 20, 2015 12:40 AM2015-12-20T00:40:36+5:302015-12-20T00:40:36+5:30
एका १९ वर्षांच्या विवाहित मुलीला झालेली भूतपिशाच्छाची बाधा उतरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्याच घरातील देवघरात तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील
मुंबई: एका १९ वर्षांच्या विवाहित मुलीला झालेली भूतपिशाच्छाची बाधा उतरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्याच घरातील देवघरात तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील अजमेर-सौंदाणे गावातील शांताराम भूमराव झेंद या मांत्रिकास अखेर २३ वर्षांनी तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
गावात ‘शांताराम भगत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नराधमास मालेगाव सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध शांतारामने केलेले अपील गेली २० वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित होते व तो जामिनावर होता. आता अंतिम सुनावणीनंतरन्या. साधना जाधव यांनी ते अपिल फेटाळून शांतारामला सात वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी हजर होण्याकरता सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. त्याआधी शांतारामने २२ डिसेंबरपूर्वी मालेगाव सत्र न्यायालयापुढे हजर होऊन आपला ठावठिकाणा द्यायचा आहे.
‘भूत’ झोंबलेल्या या मुलीवर शांताराम खोली बंद करीत असताना बाहेर पाहरा देऊन त्याला या गुन्ह्यात साथ दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने अशोक देवमण पवार या आणखी एका आरोपीस चार वर्षांचा कारावास ठोठावला होता. शांतारामने सांगितले म्हणून तो देवघराच्या खोलीबाहेर उभा राहिला हे खरे असले तरी शांताराम आत असले काही दुष्कृत्य करेल,याची त्याला कल्पना होती यास काही सबळ पुरावा नाही, असे म्हणत न्या. जाधव यांनी त्याचे अपिल मंजूर केले व त्याची निर्दोष मुक्तता केली.
आपण मांत्रिक नाही. जडीबुटीची औषधे देणारा वैदू आहोत. त्यामुळे भूत उतरविण्याचे मंत्र-तंत्र आपल्याला माहित नाही, असे सांगून आपण नकार दिला म्हणून या मुलीने व तिच्या नातेवाईकांनी आपल्याविरुद्ध हे कुभांड रचले. शिवाय वैद्यकीय तपासणीतही गेल्या २४ तासांत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही, असा बचाव शांतारामने घेतला होता. परंतु तो अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, शांतारामने मध्यरात्रीच्या सुमारास या मुलीला देवघरात खेचून नेऊन दरवाजा लावून घेतला, त्यानंतर ती मुलगी अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत बलात्कार झाल्याचे ओरडत बाहेर आली या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोणीही स्त्री ज्याच्याशी आपली ओळख-पाळख नाही अशा व्यक्तीवर बलात्काराचा खोटा आरोप करणे संभवनीय वाटत नाही.
सहाय्यक सरकारी वकील अरफान सेठ यांनी शांतारामवरील दोषारोप न्यायालयास यशस्वीपणे पटवून दिले. आरोपी शांताराम याच्यासाठी अॅड. पी. के. ढाकेफळकर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
सुरेखाबार्इंनी दिला सल्ला
या दुर्दैवी बलात्कारितेचे माहेर सटाणा तालुक्यातील दाभाडी गावचे. लग्नापूर्वी ही ती अधून-मधून झपाटल्यासारखे करायची. लग्नानंतर काही वेळा असे झाल्यावर तिच्या पतीने हा प्रकार तिच्या माहेरच्या लोकांना सांगितला. तिच्या आईने याविषयी विचारणा केल्यावर गावातील सुरेखाबाई नावाच्या महिलेने अजमेर-सौंदाणे येथे राहणारा आपला मोठा दीर भूत उतरवितो, असे सांगितले.
या मुलीला घेऊन तिचे पती व नातेवाईक संध्याकाळच्या वेळी शांतारामच्या घरी पोहोटलेतेव्हातो घरात नव्हता. त्याच्या घरच्यांनी त्यांना थांबवून घेतले, जेऊ-खाऊ घातले. रात्री १० च्या सुमारास शांताराम आला. सुरुवातीस या मुलीने शांतारामसोबत देवघरात एकटी थांबण्यास नकार दिला. त्यामुळे तिला घेऊन मंडळी घरात थांबली.मध्यरात्रीच्या सुमारास तिला पुन्हा झोंबल्यासारखे झाल्यावर इतरांना न येण्यास सांगून शांताराम मुलीला घेऊन देवघरात गेला.