लाल किल्ल्यावरून भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही!
By admin | Published: September 19, 2016 05:12 AM2016-09-19T05:12:58+5:302016-09-19T05:12:58+5:30
लाल किल्ल्यावरुन भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला
कल्याण : पंधरा वर्षापूर्वी मी लाल किल्ल्यावर गेलो होतो. तेव्हा लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा मोह मलाही आवरला नाही. अर्थात लाल किल्ल्यावरुन भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आणि प्रत्येक गोष्टीचा आधार आपल्याला मिळावा या हट्टापायी पुलांचे परस्पर उद््घाटन करण्याच्या वृत्तीबद्दल चिमटे काढले.
डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या दोेन खाडी पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी कोन येथे करण्यात आले. यावेळी खासदार कपील पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाचे खासदार कपिल पाटील या पुलाच्या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी डोंबिवलीत या पुलांच्या उद््घाटनाचा कार्यक्रम पार पाडत खुद्द मुख्यमंत्र्यांनाच शह दिला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुलाचे श्रेय मिळावे म्हणून शिवसेनेने हा कार्यक्रम पार पाडला होता. त्यातून शिवसेना-भाजापातील संघर्ष समोर आला होता. त्याचा समाचार मुख्यमंत्री घेणार हे अपेक्षित होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेला भरपूर चिमटे काढले. (प्रतिनिधी)
>शिवसेनेचा नामोल्लेख टाळत त्यांच्या कार्यकर्त्याना जे वाटले, ते त्यांनी केले. ही कृती उत्साहाच्या भरातील होती, पण नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही विकासाचे राजकारण शिकलो असल्याने असल्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
पूल पूर्ण झाल्यावर त्याच्या उद््घाटनाचा कार्यक्रम डोंबिवलीत घ्या, असे रवींद्र चव्हाण यांनी सुचवले. तेव्हा पुलाचे उद्घाटन डोंबिवलीत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण त्यावेळी पुन्हा पुलाचे दुसरे उद््घाटन कोन येथे करु नका, असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.