सीएसआर प्रकल्पांना गती द्या
By admin | Published: January 10, 2016 01:25 AM2016-01-10T01:25:29+5:302016-01-10T01:25:29+5:30
राज्यातील सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनास केली.
मुंबई : राज्यातील सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनास केली.
राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांचा राज्याच्या विविध विकास तसेच लोककल्याणकारी कामात ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’च्या माध्यमातून (सीएसआर) सक्रिय पाठिंबा आणि सहभाग मिळवण्यासाठी राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘महा सीएसआर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपालांनी ही सूचना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह सार्वजनिक- खाजगी उद्योग क्षेत्रातील तसेच वित्तीय संस्थांचे अनेक मान्यवर आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उद्योगजगताने शासनाच्या जलसंधारण कामात आपला सहभाग नोंदवावा, असे झाल्यास शासन आणि उद्योगजगत यांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्यात जलस्रोतांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती
सीएसआर कार्यक्रमांतर्गत उद्योग जगताकडून शासनाकडे येणाऱ्या विविध प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी, तसेच त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एका विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
उद्योग जगत राज्यात आजही अनेक क्षेत्रात सीएसआर कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी कामे करीत आहे. या पार्श्वभूमीवर सीएसआर प्रकल्पांसाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.