रखडलेल्या कामांना मिळणार गती
By admin | Published: March 7, 2017 03:27 AM2017-03-07T03:27:31+5:302017-03-07T03:27:31+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहिता काळात थंडगार झालेले प्रशासन पुन्हा गतिमान होऊ लागले
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहिता काळात थंडगार झालेले प्रशासन पुन्हा गतिमान होऊ लागले असून रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ही कामे सुरूदेखील केली आहे. तसेच बदल्या-बढत्या-पुनर्वसनाच्या कामांची प्रकरणे मंजुरीच्या वाटेवर असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपासून ते ठाणे महापालिका निवडणूक संपेपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. तेव्हापासून ठाणे महापालिकेच्या अधिकारीवर्गाने रस्त्यात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची कामे, लाभाची कामे असल्याचे शेरे मारून ती बाजूला केली होती. तसेच पालिकेच्या सुमारे १७० शिपायांना मिळणारी लिपिकपदाची बढती थांबवली होती. याशिवाय, अनेक विकासकामे या काळात सुरू होऊ शकली नाहीत. या व अशा अनेक कामांना मान्यता देण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. मार्चअखेर या आर्थिक वर्षाचे बजेट पूर्ण करावे लागणार आहे. हा कालावधी केवळ या महिन्यातील साप्ताहिक रजा, सार्वजनिक सुट्या धरून २२ दिवस प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे विकासकामे पूर्ण करण्यात आणि महसुलाची वसुली करताना पालिकेला घाम फुटणार आहे.
पालिकेचे शिपाई लिपिकपदावर बढती मिळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत असून हे आदेश लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती प्रशासनातून मिळाली आहे. मात्र, ही बढती होत असताना पालिकेला रिक्त पदांची भरती करावी लागणार आहे. रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या असंख्य लोकांचे पुनर्वसन प्रस्ताव रखडलेले असून हे प्रस्ताव कधी मंजूर करणार, यासाठी नागरिक रोज पालिकेत हेलपाटे मारत आहेत. (प्रतिनिधी)
अनेक विकासकामे निवडणूक काळात सुरू होऊ शकली नाहीत. अशा अनेक कामांना मान्यता देण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. मार्चअखेर या आर्थिक वर्षाचे बजेट पूर्ण करायचे आहे. या महिन्यातील साप्ताहिक रजा, सार्वजनिक सुट्या धरून आता केवळ २२ दिवस हातात आहेत.