अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती

By admin | Published: August 4, 2016 02:52 AM2016-08-04T02:52:13+5:302016-08-04T02:52:13+5:30

महत्त्वाकांक्षी अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पास गती मिळावी, यासाठी बुधवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली

Speed ​​of internal navigation project | अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती

अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती

Next


ठाणे : ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पास गती मिळावी, यासाठी बुधवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आणि भिवंडी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरांतर्गत आणि मीरा-भार्इंदर, वसई-विरार, भिवंडी आणि कल्याण या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याबाबत मागील आठवड्यात केंद्रीय भूपृष्ठ आणि सागरी वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाबाबत सादरीकरण केले होते. या बैठकीत गडकरी यांनी या संकल्पनेला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात बुधवारी बैठक झाली. त्यात प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करणे, तांत्रिक बाबी तपासणे, केंद्राकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे आदीसाठी संयुक्त समितीची स्थापना करून दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच गायमुख येथे जेटी बांधणे, त्या परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच ते स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, याबाबत चर्चा होऊन सदर प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
>या प्रकल्पांतर्गत ठाण्यांतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू करणे तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-बोरिवली आदी मार्गांवर जलवाहतूक सेवा प्रस्तावित करण्यात येणार आहे.
या जलवाहतूक प्रकल्पाचे मुख्य वाहतूक केंद्र हे कोलशेत येथे बनवण्यात येणार असून या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, पार्किंग व्यवस्था, तिकीट काउंटर यासह सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
याबाबतचा प्रस्ताव या सर्व महापालिकांच्या वतीने बनवण्यात येणार असून तो केंद्रास सादर करण्यात येणार आहे. यासाठी मेरीटाइम बोर्डाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

Web Title: Speed ​​of internal navigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.