‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस-वेच्या कामास गती द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:08 AM2018-06-26T03:08:54+5:302018-06-26T03:08:57+5:30
एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले साऊथ कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या
मुंबई : एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले साऊथ कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेचे काम अत्यंत गतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरियन शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात साऊथ कोरियाचे मुंबईतील कौन्सल जनरल सौंजेन कीम, विकास वित्त केंद्राचे महासंचालक तैसिक युन, एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेचे संचालक नॅमसंग किम, सेंगयंग छोई यांचा समावेश होता. बैठकीत मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वे बाबत चर्चा झाली. कोरियन कंपनी या मार्गाचे काम करणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वे हा सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जगातील एकमेव व्हावा. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहे, पण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, काम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ज्ञांनी पाहणी करावी. महामार्ग आणि रस्ते सुरक्षा याबद्दलच्या तंत्रज्ञानावरही अधिक भर द्यावा. ह्युंग क्वान को यांनी १० बिलियन डॉलर एक्सप्रेस-वे विकास संस्थेसाठी आणि ९ बिलियन डॉलर एक्स्पोर्टवर खर्च करण्याची तयारी यावेळी दाखविली.