मराठीतही आता स्पेलचेकर !
By admin | Published: February 27, 2016 03:02 AM2016-02-27T03:02:26+5:302016-02-27T03:02:26+5:30
इंग्रजी भाषेत टायपिंग करताना एखादा शब्द चुकल्यास लगेचच लाल रेषेने अधोरेखित होऊन स्पेलचेकरच्या माध्यमातून ही चूक सुधारली जाते. मात्र मराठी भाषेत टायपिंग करताना ही सेवा
- स्नेहा मोरे, मुंबई
इंग्रजी भाषेत टायपिंग करताना एखादा शब्द चुकल्यास लगेचच लाल रेषेने अधोरेखित होऊन स्पेलचेकरच्या माध्यमातून ही चूक सुधारली जाते. मात्र मराठी भाषेत टायपिंग करताना ही सेवा उपलब्ध नाही. नेमकी ही गरज ओळखून राज्य मराठी विकास
संस्थेने संगणकीय प्रकल्पांतर्गत मराठी भाषेत ‘स्पेलचेकर’ आणण्याचे ठरविले आहे. या स्पेलचेकरसोबतच संगणकीय कामकाजात मराठी भाषेच्या सुलभतेसाठी विविध नवीन सेवा आणण्यात येणार आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या प्रकल्पांतर्गत ‘स्पेलचेकर’, ‘टेक्स्ट टू स्पीच’, ‘स्पीच टू टेक्स्ट’ अशा सेवाही लवकरच मराठी भाषेत सुरू करण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक बैठकीत या प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आखलेल्या ‘लँग्वेज टेक्नोलॉजी व्हिजन : २०१०’ या प्रकल्पामध्ये राज्य मराठी विकास संस्था सहभागी झाली होती. आयआयटी, एनसीएसटी, सी-डॅक या संस्थांबरोबर संगणकीय मराठी भाषेच्या प्रकल्पांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या संस्था सध्या एकत्रित कार्यरत आहे.
टाईपरायटर जाऊन संगणक आल्यानंतर मराठीचे लेखन त्यावर होऊ लागले आणि शुद्धलेखनासाठी ‘स्पेलचेकर’ची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. मातृभाषा मराठीतून शिकलेल्यांनाही बऱ्याचदा ऱ्हस्व आणि दीर्घ अचूक लिहिताना अडचण जाणवते. मात्र, ही अडचण आता लवकरच दूर होऊन मराठीतील ‘स्पेलचेकर’ येणार आहे. स्मार्टफोन्ससह वर्ड, एक्सल आणि अशा इतर सॉफ्टवेअरमध्ये मराठी स्पेलचेकरचा वापर करता
येईल. मराठी टायपिंग करताना शुद्धलेखनातील चूक लाल
रेषेने अधोरेखित होणार आहे. त्यावर राईट क्लिक करून योग्य शब्द दिसेल, अशा पद्धतीने चुकीचा शब्द सुधारता येईल.
‘टेक्स्ट टू स्पीच’, ‘स्पीच टू टेक्स्ट’ या सेवांमध्येसुद्धा अनुक्रमे एखादा शब्द लिहिल्यास तो ऐकू येईल आणि एखादा शब्द बोलल्यास तो लिहिला जाईल, यावरही सध्या वेगाने काम सुरू आहे.
भविष्यात, राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेले सर्व कोश आणि पुस्तके अॅपच्या स्वरूपातही आणण्याचा विचार राज्य मराठी विकास संस्थेच्या पातळीवर सुरू आहे.
‘काम वेगाने सुरू’
मराठी भाषेतील संगणकीय प्रकल्पांचे प्राथमिक टप्प्यातील काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पांच्या परिपूर्णतेसाठी संगणक तज्ज्ञ, भाषा अभ्यासक - संशोधक आणि इतर तज्ज्ञांशीही चर्चा करून या सेवा जास्तीतजास्त सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील.
- प्रा. डॉ. आनंद काटीकर,
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था