दिवाळी फराळाला मसाल्यांच्या महागाईची फोडणी; हळद, वेलचीचे दर दुप्पट; तर जिरे तिपटीने महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:22 PM2023-11-03T12:22:38+5:302023-11-03T12:22:48+5:30

महागाईच्या तडाख्यामुळे सर्वसामान्यांना फराळ बनविताना खिसा-पाकिटाचा विचार करावा लागणार

Spice Inflation Crackdown on Diwali Snacks; Double rates of turmeric, cardamom; Cumin became three times more expensive | दिवाळी फराळाला मसाल्यांच्या महागाईची फोडणी; हळद, वेलचीचे दर दुप्पट; तर जिरे तिपटीने महागले

दिवाळी फराळाला मसाल्यांच्या महागाईची फोडणी; हळद, वेलचीचे दर दुप्पट; तर जिरे तिपटीने महागले

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याचे दर नियंत्रणात आले असले, तरी फराळाच्या अन्य वस्तूंचे दर वाढले आहेत. साखर, गुळाचे दर तेजीत आहेत. हळद, वेलचीचे दर दुप्पट, तर जिरे गतवर्षीच्या तुलनेत तीन पट महाग झाले आहे. महागाईच्या या तडाख्यामुळे सर्वसामान्यांना फराळ बनविताना खिसा-पाकिटाचा विचार करावा लागणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेवा व फराळासाठी आवश्यक वस्तूंची आवक वाढू लागली आहे. मसाला मार्केटमध्ये वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीचे चित्र पाहावयास मिळत आहे. यावर्षी सुकामेव्याचे दर नियंत्रणात आहेत. पण फराळासाठी आवश्यक असलेल्या मसाल्याच्या पदार्थांचे दर कडाडले आहेत. गुरुवारी मार्केटमध्ये दोन टन वेलचीची आवक झाली. गेल्यावर्षी ८०० ते एक हजार रुपये किलो दराने वेलचीची विक्री झाली होती. यावर्षी हेच दर १७०० ते २४०० रुपयांवर पोहोचले आहेत. जिरे २२० ते २८० वरून ६५० ते ८०० रुपयांवर गेले आहेत. हळद ८० ते ९० रुपयांवरून १४० ते २६० रुपये किलो झाली आहे. मोहरी, चारोळीचे दर मात्र नियंत्रणात आहेत.

दिवाळीमुळे साखरेची आवक प्रचंड वाढली आहे. प्रतिदिन ६० ते ७० टन साखरेची आवक होते. सोमवारी १०० टन व मंगळवारी तब्बल २७६ टन आवक झाली. गतवर्षी साखरेचे दर ३४ ते ३६ रुपये किलो होते. यावर्षी होलसेल मार्केटमध्ये साखर ३७ ते ४१ रुपये किलो दराने विकली जात आहेत. गुळाची किंमत ४५ ते ५१ वरून ४८ ते ५६ वर पोहोचली आहे. हंगाम सुरू झाला असून सोमवारपासून आवक वाढत गेल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती प्रशासनाने दिली. दिवाळीत मिठाई, चॉकलेटऐवजी सुकामेव्याला पसंती दिली जात असल्याने त्यांची आवकही वाढते आहे. मात्र त्यांचे दर अद्याप तेवढे चढे नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत त्यात माफक वाढ झाली आहे. 

दिवाळी फराळासाठीच्या वस्तूंचे प्रतिकिलो दर

  • साखर      ३४ ते ३६      ३७ ते ४१ 
  • गूळ      ४५ ते ५१      ४८ ते ५६ 
  • वेलची     ८०० ते १०००      १७०० ते २४०० 
  • हळद     ८० ते ९०      १४० ते २६० 
  • जिरे     २२० ते २८०      ६५० ते ८०० 
  • मोहरी     ६० ते ८०      ४० ते ५५ 
  • चारोळी     ८०० ते ९००      ८०० ते १००० 
  • जर्दाळू     ६०० ते ९००      ६१० ते ८५०


सुकामेव्याची आवकही वाढली

बाजार समितीमध्ये सोमवारी जवळपास ३०० टन आवक झाली होती. मंगळवारी जवळपास ३०० टन आवक झाली आहे. काजू १४२ टन, बदाम ८५, खजूर ५८, खारीक ८२, किसमिस ३१, पिस्ता ३९ व अक्रोडची ३२ टन आवक झाली आहे.

Web Title: Spice Inflation Crackdown on Diwali Snacks; Double rates of turmeric, cardamom; Cumin became three times more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.