‘भाबड्या’ अभिनेत्यांसाठी ‘आत्म्या’चे उड्डाण!

By admin | Published: March 16, 2015 11:44 PM2015-03-16T23:44:55+5:302015-03-17T00:06:12+5:30

भोंदूगिरीचा पर्दाफाश : ‘रेकी डाउजिंग’द्वारे दोन तासात म्हणे ‘तो’ सोलापूरला जाऊन आला

'Spirit' flight for 'Bhabda' actors! | ‘भाबड्या’ अभिनेत्यांसाठी ‘आत्म्या’चे उड्डाण!

‘भाबड्या’ अभिनेत्यांसाठी ‘आत्म्या’चे उड्डाण!

Next

सातारा : ‘दारूचं व्यसन आहे? मग पाण्याबरोबर नको; कच्ची प्या... मूल होत नाही? मग केवळ शुक्रवारीच शरीरसंबंध येतील याची काळजी घ्या...’ असे अफलातून ‘तोडगे’ तो सुचवत राहिला... पण त्याच्यासमोर होते तीन कसलेले ‘अभिनेते’. एक कार्यकर्ता तर दोघे पोलीस दलातले. तरीही त्याची ‘फेकाफेकी’ सुरूच होती. कथित ‘रेकी डाउजिंग’द्वारे त्याचा आत्मा कार्यकर्त्याच्या मूळ गावी, तसेच सोलापूरला त्याच्या घरीही फिरून आला म्हणे! पण, मुळात ते पत्तेच खोटे होते!!
‘श्री दत्त ज्योतिष कार्यालय’ नावाने दिवसेंदिवस व्यवसायाचा पसारा वाढवीत नेणाऱ्या विश्वास दातेला सोमवारी थेट पोलीस ठाण्यात मुक्कामाला जावे लागले. त्यासाठी रचलेली व्यूहरचना एखाद्या नाटकाच्या कथानकाप्रमाणंं होती. त्याची ‘संहिता’ सकाळीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कार्यालयात लिहिली गेली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार व्यसनाधीन, निपुत्रिक पतीच्या भूमिकेत होते. त्यांच्या पत्नी म्हणून महिला कॉन्स्टेबल मोनिका निकम तर मेहुणा म्हणून परिविक्षाधीन उपाधीक्षक नितीन जाधव दातेच्या ‘दरबारा’त पोहोचले. अरुंद लाकडी जिन्यावरून गेल्यावर जुनाट घरात दातेचं घर.  पोतदार यांना दारूच्या व्यसनावर ‘कच्ची दारू प्या’ असा उपाय सुचविणाऱ्या दातेने ‘डाउजिंग’द्वारे आपला आत्मा पोतदारांच्या मूळ गावी आणि सोलापूरच्या घरी जाऊन आल्याचा दावा केला. परंतु हे दोन्ही पत्ते त्याला खोटेच सांगण्यात आले होते. व्यवसायाच्या ठिकाणी ‘वास्तुदोष’ असून, त्यासाठी पिंडदान करण्याचा तोडगा त्याने सुचविला. पत्नीमध्ये दोष असल्याने मूल होत नसल्याचे सांगून वड-पिंपळाच्या सालीचे औषध चार महिन्यांसाठी सांगितले आणि दीड वर्षात मुलगाच होईल, अशी ‘हमी’ दिली. लैंंगिक विषयावर मार्गदर्शनही केलं. केवळ शुक्रवारीच पहाटेच्या वेळी शरीरसंबंध ठेवल्यास हे घडू शकेल, असा अजब तोडगा दिला. (प्रतिनिधी)

लोलकविद्येच्या सामर्थ्याचा दावा कायम
‘अंनिस’ कार्यकर्ते आणि पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात अडकल्याची जाणीव होऊनसुद्धा पोलीस ठाण्यात जाताना विश्वास दाते लोलकविद्येच्या सामर्थ्याचा दावा करीतच राहिला. ‘मी सगळे चांगल्यासाठीच करतो,’ असे म्हणत आपल्या उपायांमुळे लोकांची संकटे दूर होतातच, असे तो ठासून सांगत होता. ‘मला फसवण्यासाठी काहीजण आले; पण मी काम सुरूच ठेवेन,’ असे तो म्हणाला.

६८ सातारकरांनी केली वारी
विविध समस्यांनी त्रस्त असे तब्बल ६८ सातारकर दातेच्या भेटीला जाऊन आल्याचे त्याच्याच घरात सापडलेल्या नोंदींवरून आढळून आले आहे. समस्यांच्या रकान्यात ‘सर्व अडचणी’पासून मुलीचे लग्न, मुलाची नोकरी, घरगुती समस्या, पतीची दारू, आजारपण, लग्नसमस्या, मूल नसणे, दोन मुलांचे करिअर, दोन मुलांची भांडणे असा मजकूर लिहिल्याचे दिसून आले.

पश्चात्तापाचा लवलेश नाही
कारवाई पूर्ण झाल्यावर पत्रकारांनी दातेच्या घरात प्रवेश केला, तेव्हा आपल्याला सापळा रचून पकडल्याचे त्याला कळून चुकले. थोडा वेळ त्याची चलबिचल झाली; मात्र लगेचच तो सावरला. पश्चात्तापाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. उलट कॅमेरे सुरू असल्याचे पाहून त्याने पूर्वी केलेले दावे पुन्हा ठासून केले. आपल्या लोलकविद्येमुळे हैदराबाद येथील दाम्पत्यास ११ वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली, असे त्याने सांगितले. तसेच ‘लोलकविद्येचा वापर करूनच कोयना धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असा अजब दावाही त्याने केला.

लोलक म्हणतो, ‘काम नको’
पर्दाफाश झाल्यावर दातेने सांगितले, ‘हे लोक मला फसवायला आले होते. मुलं असूनसुद्धा मूल हवं असं त्यांनी मला सांगितलं. त्यांची परिस्थिती पाहून त्यांना मुलं आहेत की नाहीत, याची परीक्षा मी केली नाही.’ यावर ‘समोरच्याला मुलं आहेत की नाहीत, याची परीक्षा लोलकावरून तुम्हाला करता येते का,’ असा प्रश्न विचारला असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. ‘सांगा मला किती मुलं आहेत,’ असं म्हणून एकजण त्याच्यासमोर बसला. दातेने त्याला नाव विचारलं आणि ‘यांचं काम करायचं की नाही, हे लोलकाला आधी विचारलं पाहिजे,’ असे म्हणून त्याने लोलक हातात घेऊन डोळे मिटले. थोड्याच वेळात ‘लोलक म्हणतो आहे, यांचं काम करायचं नाही,’ हे सर्वांनाच अपेक्षित असलेलं उत्तर दातेने दिले आणि कुणालाच हसू आवरेना.

Web Title: 'Spirit' flight for 'Bhabda' actors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.